प्रशालेतील गुरुवर्यांचाही गौरव..
कुडाळ : एस्. के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी ,पाट संचलित एस्. एल्. देसाई विद्यालय , कै. एस्. आर .पाटील कनिष्ठ महाविद्यालय आणि कै. डॉ. विलासराव देसाई कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय मध्ये कै. श्रीमती राधाबाई सामंत इंग्लिश मीडियम स्कूलचा नामकरण सोहळा आणि प्रशालेतील गुरुवर्यांचा गौरव समारंभ उत्साहात आणि थाटात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुडाळ हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक का .आ.सामंत, तसेच मुख अतिथी भगीरथ प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा प्रसाद देवधर, तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेतील ज्येष्ठ इंग्रजी शिक्षक तानाजी काळे यांनी संगीतबद्ध व शब्दबद्ध केलेल्या ईशस्तवन व स्वागत गीताच्या मंगलमय वातावरणात झाली. सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर इंग्लिश मीडियम स्कूलच्या नामकरण फलकाचे उद्घाटन डिजिटल माध्यमा द्वारे संस्था अध्यक्ष दिगंबर सामंत व सौ. स्मिता दिगंबर सामंत यांच्या शुभ हस्ते करण्यात आले
कोकणशी समरस मला व्हायचे आहे. त्याचबरोबर उच्च दर्जाची शाळा, खूपच सुंदर वातावरण, ज्ञानाचे नवीन दालन संस्थेने तुम्हाला उपलब्ध करून दिले आहे. त्या ज्ञानामध्ये तुम्ही पारंगत व्हा व तुमची ज्ञानाची गंगा सतत वाहत राहू द्या; असा अनमोल संदेश कार्यक्रमाचे अतिथी तहसीलदार सचिन पाटील यांनी मनोगतातून दिला. यांना ज्या दात्यांनी या प्रशालेसाठी चार एकर जमीन दान केली असे कै. शिवराम रामा राऊळ यांचे बंधू नारायण सिताराम राऊळ यांचाही संस्था व प्रशालेच्या वतीने संस्था अध्यक्ष दिगंबर सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
संस्था अध्यक्ष दिगंबर अच्युत सामंत यांनी पन्नास वर्षे अखंडपणे आणि निष्ठेने शिक्षण क्षेत्राची अविरत निस्वार्थी सेवा केली आहे. शिक्षक म्हणून 32 वर्षे ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले आहे तसेच संस्थेचे सचिव उपाध्यक्ष व अध्यक्ष या जबाबदाऱ्या अगदी लीलया पार पाडल्या. शाळेच्या शैक्षणिक उन्नतीसाठी, बौद्धिक सुविधा निर्माण करण्यासाठी, तसेच सामाजिक व सांस्कृतिक कार्यात विद्यालयाला अग्रेसर करण्यासाठी त्यांनी तन-मन-धन आणि वेळ अर्पण केला आहे. विशेष म्हणजे कै. श्रीमती राधाबाई सामंत इंग्लिश मीडियम स्कूल उभारण्यासाठी त्यांनी व त्यांचे बंधू गजानन सामंत, सामंत सरांच्या सुविद्य पत्नी आणि त्यांच्या मुली आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अनमोल असे सहकार्य केले आहे. त्यामुळे डी .ए . सामंत सर आणि त्यांच्या कुटुबीयांचा सन्मान सर्व संस्था चालक, सर्व कर्मचारी आणि माजी विद्यार्थी यांच्यावतीने कार्यक्रमांचे अध्यक्ष का. आ.सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.
शालेय प्रशालेतील शिक्षिका यज्ञा साळगांवकर यांनी संस्था कार्याध्यक्ष दिगंबर सामंत, प्रशालेचे मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक राजन हंजनकर ,ज्येष्ठ इंग्रजी शिक्षक तानाजी काळे,ज्येष्ठ गणित शिक्षक गुरुनाथ केरकर या सर्व गुरुवर्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव आपल्या कृतज्ञतापूर्वक भाषणातून केला. संस्था सदस्य राजेश सामंत यांनी संस्थेची यशस्वी वाटचाल आणि सर्व सत्कार मूर्ती या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.
1994 सालापासून मी या प्रशालेत काम करत आहे. हा सन्मान फक्त माझा नसून माझ्या विद्यार्थ्यांचा सर्व शिक्षकांचा सर्व संस्थाचालकांचा आहे. हा सत्कार मी त्यांना समर्पित करतो. संस्था व शाळेची भरभराट होऊ देत .शाळेचे मोठेपण तेच माझे मोठेपण .संस्थेचे मोठेपण तेच माझे मोठेपण; असे भावपूर्ण मनोगत ज्येष्ठ शिक्षक तानाजी काळे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. मी या सत्काराने भारावून गेलो आहे. फणसेकर सरांनी दिलेली कामाची संधी ,नाईक सरांनी पाठीवर मारलेली कौतुकाची थाप, त्यावेळचे सर्व संस्थापदाधिकारी त्यांच्यामुळेच मी आज इथे या प्रशालेत काम करत आहे. मला सर्व सहकार्यांचे सहकार्य लाभले. सगळ्या उपक्रमांमध्ये मी प्रामाणिकपणे काम केले आणि या कामाचे या सर्व संस्थापदाधिकाऱ्याने कौतुक केले.या सर्व कौतुकाने, सत्काराने मी भारावून गेलो आहे; असे मनोगत प्रशालेतील ज्येष्ठ गणित शिक्षक गुरुनाथ केरकर यांनी केले.
हा माझा माझ्या आयुष्यातील खूपच हृदयस्पर्शी, भावनिक, लाख मोलाचा क्षण आहे. शाळेचे ऋण फेडणे खूपच कठीण आहे. प्रशालेतील विद्यार्थी नवनवीन शिखरे पादाक्रांत करतील यात शंकाच नाही. आई-वडील, आजोबा त्यांच्या संस्कारांच्या शिदोरीवरच मी कार्यरत आहे; असे भावपूर्ण उद्गार प्रशालेचे मुख्याध्यापक राजन हंजनकर यांनी आपल्या भाषणात काढले.
या शाळेचे आणि माझे 40 वर्षापासूनचे ऋणानुबंध आहेत. पूर्वीच्या शाळा या संस्था नव्हत्या तर कुटुंब होत्या. आयुष्य संपन्न करणारी ही संस्था आहे. मनामध्ये संमिश्र भावनांचा कल्लोळ सुरू आहे. आपल्या शाळेचे पावित्र्य आपणच नेहमी जपले पाहिजे; असा अनमोल संदेश गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. शिक्षक, शेतकरी, डॉक्टर यांनी कधीही निवृत्त होऊ नये. आयुष्यामध्ये शिस्तप्रिय दरारा खूपच महत्त्वाचा असतो. बौद्धिक दरारा वाढणेही तितकेच महत्त्वाचे आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्ञानसंपन्न होण्यासाठी तीव्र इच्छाशक्ती असावी लागते. आयुष्य सोन्यासारखे होण्यासाठी आता कष्ट करा. मातृभाषा ही ज्ञानभाषा असायला हवी. माध्यमाच्या प्रेमात न पडता संस्कृती आपली टिकवून ठेवली पाहिजे; असा अनमोल संदेश कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भगीरथ प्रतिष्ठानचे प्रमुख डॉ.प्रसाद देवधर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना दिला.
या माझ्या सत्कारामध्ये संस्थेच्या प्रगतीचा वाटा व संस्था कार्यकारणीतील सदस्यांचा वाटा खूप मोठा आहे .तुम्हाला एका छता खाली सगळ्या शैक्षणिक सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी हा प्रयत्न आहे .मी माझे काम असेच पुढेही सुरू ठेवणार आहे पूर्वी अत्यंत गरिबीतून जगत असताना सुद्धा माझ्या आईने आमचे शिक्षण थांबू दिले नाही; म्हणून मी आज येथे आहे .जीवनात चांगले शिक्षण हे जितके महत्त्वाचे तितके चांगले माणूस बनणे त्यापेक्षा महत्त्वाचं असते .असा अनमोल संदेश संस्थेचे अध्यक्ष दिगंबर सामंत यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना दिला. शालेय परिसर व शिस्त यावरून तुम्ही कौतुकास पात्र आहात .असे कौतुकोद्गागार कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष का.आ. सामंत यांनी आपल्या भाषणात काढले. जास्तीत जास्त पुस्तकांचे वाचन करून ज्ञानसंपन्न व्हा; असाही अनमोल संदेश त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना दिला.
सन 1960 मध्ये संस्थेने लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून ही संस्था सतत प्रयत्नशील असते असे मनोगत प्रशालेचे पर्यवेक्षक सयाजी बोंदर यांनी आपल्या प्रास्ताविकात केले. संस्था कार्याध्यक्ष देवदत्त साळगांवकर, आणि इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक श्री. तुषार आंबेरकर यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सर्व मान्यवर प्रमुख पाहुण्यांचा परिचय संस्था पदाधिकारी महेश ठाकूर यांनी समर्पक शब्दांत करून दिला. संस्थेच्या वतीने सर्व संस्थापदाधिकाऱ्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा सत्कार केला. कै. राधाबाई सामंत इंग्लिश मीडियमच्या इयत्ता पहिली ते पाचवी मधील विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेतून सुंदर अशी भाषणे सादर केली.
या कार्यक्रमास संस्था सचिव विजय ठाकूर, संस्था हिशोब तपासणीस शरद कोनकर, खजिनदार दीपक पाटकर, संस्था सदस्य नारायण तळावडेकर ,अवधूत रेगे, सुधीर मळेकर, माजी कार्याध्यक्ष समाधान परब, माजी कार्यवाह सुधीर ठाकूर, माजी संस्था सदस्य सुभाष चौधरी पंचक्रोशीतील सरपंच, संस्था हितचिंतक, शिक्षण प्रेमी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक संदीप साळसकर यांनी केले आणि आभार इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक तुषार आंबेरकर यांनी मानले.
