मालवण विकासासाठी भाजप एकजूट…

शिल्पा खोत:उद्या मालवणात भाजपची भव्य रॅली..

⚡मालवण ता.३०-: मालवण नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजप कार्यकर्त्यांनी मालवण शहरात जी प्रचार यंत्रणा राबविली त्यामुळे घराघरात भाजपची कमळ ही निशाणी पोहोचविण्यात आम्हाला यश आले आहे. मालवण शहरात प्रचार यंत्रणा राबविताना शहरवासीयांनी जो उदंड प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे. यामुळे या निवडणुकीत माझ्यासह भाजपचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होणार असल्याचा दावा भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शिल्पा यतीन खोत यांनी पत्रकार परिषदेत केला.

भाजप तालुका कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सौ. खोत बोलत होत्या. यावेळी तालुकाप्रमुख धोंडी चिंदरकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अशोक सावंत उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत बोलताना सौ. शिल्पा यतीन खोत म्हणाल्या भाजपकडून केंद्र आणि राज्य शासनातर्फे राबविण्यात आलेल्या योजना आणि करण्यात आलेल्या विकासकामांच्या जोरावरच आम्ही मतदारांपर्यंत पोहोचलो होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री नीतेश राणे, खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मालवणचा सर्वांगीण विकास करण्याचे स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत. विरोधकांनी चुकीच्या माहितीद्वारे आमच्यावर टीका केली होती, मात्र मतदारांनी आम्हाला साथ करत विरोधकांच्या खोट्या प्रचाराची हवाच काढून टाकली आहे. माझे जातप्रमाणपत्र हे वैध असून निवडणूक आयोगानेही ते वैध ठरविलेय, असेही सौ. खोत म्हणाल्या.

मालवणात उद्या भाजपची रॅली

मालवण शहरात भाजपच्या प्रचाराची सांगता करण्यासाठी बाजारपेठेत भव्य रॅली राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत १ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता भरड ते फोवकांडा पिंपळ अशी काढण्यात येणार आहे. या रॅलीची सांगता फोवकांडा पिंपळ येथे करून तेथे जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली.

You cannot copy content of this page