⚡सावंतवाडी ता.३०-: यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल आयोजित स्पोर्ट्स मिट 2025 हा बहुप्रतिक्षित क्रीडा महोत्सव आज उत्साहात आणि दिमाखात सम्पन्न झाला. प्री-प्रायमरीपासून दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेत उत्साहाला उधाण आणले. विद्यार्थी व पालकांच्या उत्कृष्ट प्रतिसादामुळे कार्यक्रम रंगतदार बनला. रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या सोहळ्यात क्रीडा आणि सांस्कृतिक उर्जेचा अप्रतिम संगम अनुभवायला मिळाला.
उद्घाटन शाळेचे संस्थापक अच्युत सावंत भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई, सदस्या सानिका देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, तसेच मुख्याध्यापिका प्रियंका देसाई, उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. क्रीडा मशाल प्रज्वलीत करून आणि आकर्षक मार्च पासद्वारे स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन झाले. विविध हाऊसच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या शिस्तबद्ध संचलनाने उपस्थितांची मने जिंकली. प्री-प्रायमरी विद्यार्थ्यांच्या स्पर्धांनी कार्यक्रमाला सुरुवात झाली. पुढे प्रायमरी व सेकंडरी विभागातील विविध क्रीडा प्रकारांनी वातावरण रंगून गेले. मुख्य आकर्षण ठरलेली रस्सीखेच स्पर्धा विशेष जल्लोषात पार पडली.
यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेले मार्शल आर्ट्सचे दिमाखदार प्रदर्शन खऱ्या अर्थाने कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरला. पारंपरिक लाठी-काठी, दांडपट्टा व तलवारबाजी यांच्या प्रात्यक्षिकांना सर्वांची दाद मिळाली. लहान मुलांनी सादर केलेला मल्लखांब हा प्रकारही विशेष आकर्षण ठरला. उत्कृष्ट तंदुरुस्ती, संतुलन आणि कौशल्य यांचा अप्रतिम संगम पाहून प्रेक्षक भारावून गेले. कार्यक्रमाच्या शेवटी सादर झालेल्या फायर बॉल मधून आरपार जाण्याचा थरारक प्रयोग हा सर्वात धाडसी आणि रोमांचक क्षण ठरला. तज्ञ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत सादर झालेल्या या धाडसी खेळाने सर्वांची वाहवा मिळवली.
स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, मेडल व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
