दिग्गजांच्या उपस्थितीत रंगली नाट्यरंग मैफिल…

सद्गुरु संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे साभिनय‑सवेश नाट्यपदांचे सादरीकरण…

⚡सावंतवाडी ता.३०-: श्री सद्गुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळ आणि सद्गुरु संगीत विद्यालय, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी राजवाडा सभागृहात 28 तारखेला “नाट्यरंग” साभिनय‑सवेश नाट्यपदांचे सादरीकरण ही मैफिल दिमाखात संपन्न झाली.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्ह्यातील ज्येष्ठ नाट्य‑दिग्दर्शक, नाट्यरत्न श्री वसंत उर्फ भाऊ साळगावकर, सुप्रसिद्ध नाट्य‑दिग्दर्शक श्री गणेश ठाकूर, सुप्रसिद्ध गायक व संगीत अलंकार श्री दिप्तेश मेस्त्री, जिल्हा बालकल्याण समिती सदस्या व सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. नम्रता नेवगी, गुरुवर्य श्री निलेश मेस्त्री व सुप्रसिद्ध तबला वादक श्री किशोर सावंत, मंडळाचे सचिव श्री वैभव केंकरे, श्री सोमा सावंत, दिनकर परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्रीफळ वाढवून करण्यात आले.
भास्कर मेस्त्री व नितीन धमापूरकर यांनी “हे जगदीश सदाशिव शंकर” या नांदीने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर विभव विचारे, नेहा दळवी, तन्वी मेस्त्री, पूजा दळवी, स्मिता गावडे, मानसी वझे, कर्तव्य बंदिवडेकर, श्रिया म्हालटकर, उमा तिळवे, संजीवनी विचारे, सानिका सासोलकर, चिन्मयी मेस्त्री, वैष्णवी कनयाळकर, वैभवी परब, स्मिता केंकरे, निलांगी गावडे, दत्तगुरु जोशी, अनामिका मेस्त्री, प्राची दळवी, अलिशा मेस्त्री, मुग्धा पंतवालावलकर, हेमंत गोडकर, गौरी जोशी या विद्यार्थ्यांनी विविध संगीत‑नाटकांमधील “राधा धर मधू मिलिंद”, “मम आत्मा गमला”, “होशी कैसा भ्रान्त चित्त तू”, “हे सुरांनो चंद्र व्हा”, “घाई नको बाई अशी” आदी. निवडक अजरामर नाट्यपदे अतिशय प्रभावीपणे साभिनय‑सवेश सादर केली.
कार्यक्रमास श्री निलेश मेस्त्री व मंगेश मेस्त्री (ऑर्गन), मनीष पवार, समर्थ केळूस्कर, साक्षी गांवकर, तन्वी मेस्त्री (हार्मोनियम), श्री किशोर सावंत, निरज मिलिंद भोसले व सिद्धेश सावंत यांनी तबला साथ केली. प्रथम उद्घाटनाच्या सत्राचे निवेदन श्री वैभव केंकरे यांनी केले तर नटी व सूत्रधार साकारत श्री संजय कात्रे व सौ. आशा मुळीक यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन आपल्या खास शैलीत केले. विजय निगुडकर यांनी रंगभूषा, संतोष गांवकर यांनी रंगमंच व्यवस्था व ध्वनी संयोजन श्री हेमंत मेस्त्री‑पडेलकर यांनी केले.
कोणत्याही प्रकारचा नाट्य‑क्षेत्राचा अनुभव नसतानाही सर्व विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे नाट्यपदांचे सादरीकरण केले व निलेश मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत‑नाटकांच्या वैभवशाली परंपरेची ओळख पुढील पिढीला करून देण्याचे काम सर्वजण करत आहेत, असे गौरवोद्गार भाऊ साळगावकर यांनी केले. निलेश मेस्त्री यांनी सद्गुरु संगीत विद्यालयाच्या माध्यमातून नव्या पिढीच्या मनात संगीत‑नाटकाला नवसंजीवनी दिली, असे प्रतिपादन गणेश ठाकूर यांनी केले.
सावंतवाडी संस्थानचे युवराज श्री लखमराजे सावंत‑भोसले यांनी कार्यक्रमास शुभेच्छा भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त अधिकारी श्री आर.एम. जोशी यांनी कार्यक्रमासाठी खास नृसिंहवाडी येथून हजेरी लावून सर्व विद्यार्थ्यांची प्रशंसा केली. रोटरी क्लब सावंतवाडीचे माजी अध्यक्ष प्रमोद भागवत, इन्सुली हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक विनोद गांवकर, श्रीकांत जोशी, तानाजी सावंत, हेमंत खानोलकर, पुंडलिक दळवी, रसिका मिठबावकर, उत्कर्षा मेस्त्री, मानसी भोसले, मंजिरी धोपेश्वकर, बाळ पुराणिक, श्रीपाद चोडणकर, बाळू गांवकर, वर्षा देवण, केतकी सावंत, निधी जोशी व इतर अनेक दिग्गजांनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली. रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शेवटपर्यंत कार्यक्रमाचा आनंद घेतला.

You cannot copy content of this page