माजी खासदार विनायक राऊत यांची घणाघाती टीका..
⚡मालवण ता.२८-:
गेल्या काही वर्षात भाजप आणि निवडणुका हे समीकरण पैशाने जोडले गेले आहे. विकासकामांवर मते मागण्याऐवजी पैशाच्या जोरावर मते खेचायची असे घाणेरडे राजकारण राणे कुटुंबियानी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु केले आहे. दुर्दैवाने आज एक राणे पैसे वाटतो आणि दुसरा राणे ते शोधून काढतो आणि पोलिसांच्या ताब्यात देतो असे घडत असून हा नियतीने उगवलेला सूड आहे, दोन भावांच्या भांडणात आम्हाला बोलायचे नाही, ‘सख्खे भाऊ पक्के वैरी’ ही म्हण आज या राजकारण्यानी सिद्ध करून दाखवली आहे, अशी टीका उबाठा शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी मालवण येथे बोलताना केली.
मालवण येथे उबाठा शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजा करलकर व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी खासदार विनयाका राऊत यांनी मालवण शहरात काही भागात दौरा करीत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर श्री. राऊत हे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उमेश मांजरेकर, समीर लब्दे आदी व इतर उपस्थित होते.
यावेळी विनायक राऊत म्हणाले, भाजपला आता गद्दार गटाची म्हणजेच शिंदे गटाची आवश्यकता राहिलेली नाही. भाजपा आणि शिंदे गटात एकमेकांच्या उरावर बसण्याची सुरुवात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून झाली असून येत्या काळात महाराष्ट्रात शिंदे गटाला हद्दपार केल्याची घोषणा भाजप करेल अशी टीकाही विनायक राऊत यांनी केली.
यावेळी विनायक राऊत म्हणाले, मालवण नगरपालिकेच्या मागच्या टर्ममध्ये उबाठा शिवसेनेची बॉडी शहरात उत्कृष्ट सेवा देण्यात यशस्वी ठरली. प्रलंबित असलेली भुयारी गटार योजना, भूमिगत विद्युत लाईन आदी योजनाना चालना देण्याचे काम केले. मालवणच्या नवीन बंदर जेटीचे काम करण्यात आले. आपल्या व माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून मालवणच्या नवीन एसटी डेपोचे काम करण्यात आले. मालवण ग्रामीण रुग्णालयात सेवा सुविधाबरोबरच आवश्यक डॉक्टर उपलब्ध करण्यात आले. पर्यटकांना समाधान वाटावे अशा सेवा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. मालवण शहर स्वच्छ व सुंदर होण्याच्या दृष्टीने काम करण्यात आले. मालवण शहराला तौक्ते वादळाने तडाखा दिला त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मालवण शहरात येऊन पाहणी केली, त्यावेळी केलेल्या मागणीनुसार मालवण शहर किनारी भागात भूमिगत वीज लाईन टाकण्याचे काम उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नातून मंजूर होऊन कामास सुरुवात झाली. मालवण नगरपालिकेवर पुन्हा उबाठा शिवसेनेची सत्ता आल्यास शहरांत असलेल्या समस्या राहणार नाहीत, असे काम आम्ही करून दाखवू, असेही विनायक राऊत म्हणाले.
सध्याच्या राजकारणात नव्या तरुण पिढीची गरज आहे. घाणेरड्या राजकारणाने समाज बिघडवण्याचे काम जे करत आहेत त्यांना धडा शिकवण्यासाठी नवीन तरुण कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधी बनणे गरजेचे आहे. म्हणूनच ज्यांचे पारंपारिक साम्राज्य होते त्यांना धक्का देऊन नवे विचार व नवे ध्येय असणाऱ्या तरुण चेहऱ्यांना उबाठा शिवसेनेने उमेदवारी दिली आहे, त्यांच्याकडून चांगले काम होईल, असा विश्वास विनायक राऊत यांनी व्यक्त केला.
