पैशांच्या बॅगेवर तातडीने कारवाईची मागणी:पोलिसांनी गस्त वाढवावी, एफआयआर दाखल करावा — राणेंचा आग्रह..
⚡मालवण ता.२७-: मालवण येथील भाजपचे कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरी आम. निलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन करीत टाकलेल्या धाडीत खोलीमध्ये पाचशे रुपयांच्या नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडल्यानंतर या प्रकरणाबाबत पोलीसांनी कोणती कारवाई केली याबाबत माहिती घेण्यासाठी आज दुपारी आम. राणे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत पाटील आणि पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांची भेट घेतली . या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना आम. निलेश राणे यांनी याबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सनियंत्रण समितीला
कळविले असल्याने त्याच्या अहवालनंतर कारवाई होणार आहे मालवण शहरांत अजूनही काही ठिकाणी असेच प्रकार होण्याची शक्यता असून पोलिसांनी गस्त वाढवावी अशा सूचना आपण केल्याचे आम. निलेश राणे यांनी सांगितले.
मालवण निवडणुकीच्या धामधुमीत काल सायंकाळी आम. निलेश राणे यांनी भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांच्या घरात धाड टाकली होती. यावेळी केनवडेकर व त्यांच्या समवेत असलेल्या कार्यकर्त्यांकडे आम. राणे यांना सुमारे २० ते २५ लाख रुपयांच्या नोटा भरलेली बॅग सापडून आली. यावेळी आम. राणे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीसानाही बोलावून घेतले होते. हे पैसे मालवण निवडणुकीत मतदारांना वाटण्यासाठी आणले गेले होते असा आरोप आम. निलेश राणे यांनी केला होता. या धाडीमुळे मालवणसह राज्यभरात खळबळ उडून मालवणातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
या धाडीबाबत निवडणूक विभाग व पोलीसांनी काय कारवाई केली याबाबत जाणून घेण्यासाठी आज दुपारी आम. निलेश राणे यांनी मालवण नगरपालिकेत नगरपालिका निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत पाटील व मालवणचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांची भेट घेऊन चर्चा केली.
निवडणूक निर्णय अधिकारी श्री. पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेत पाटील यांनी निवडणुकीतील अशा प्रकरणाबाबत तपास करण्यासाठी एक अहवाल समिती असून यां समितीला आम्ही प्राथमिक माहिती दिलेली आहे. याबाबत समितीकडून निवडणूक विभाग व पोलीस यांच्यामार्फत चौकशी करण्यात येत असून चौकशीनंतर समितीकडून अहवाल प्राप्त होऊन निवडणूक विभाग व पोलिसांना पुढील कार्यवाहीच्या सूचना करण्यात येणार आहे, त्यानुसार आम्ही पुढील कार्यवाही करू असे सांगितले. या प्रकरणानंतर निवडणूक विभागाने गस्त व दक्षता वाढवावी अशी सूचना केली असता त्यावर श्री. पाटील यांनी मालवणात आणखी दोन दक्षता पथके वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले.
आमदार निलेश राणे यांनी मालवण पोलीस ठाण्याला भेट देत पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांच्याशी चर्चा केली यावेळी झालेल्या चर्चेत आम. निलेश राणे यांनी सदर प्रकरणात एफआयआर दाखल होण्यासाठी पोलिसांनी सहकार्य करावे असे सांगितले. तसेच पैसे आणण्याचे आणखीही प्रकार होण्याची शक्यता आहे, काल आणखीही काही व्यक्ती त्या दृष्टीने फिरत होत्या, आमचे माणूस त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. मात्र पोलिसांनी आपली गस्त वाढवून अशा घटनांवर बारकाईने लक्ष ठेवावे, असेही आम. निलेश राणे यांनी श्री. जगताप यांना सांगितले.
यानंतर पत्रकारांशी बोलताना आम. निलेश राणे म्हणाले, काल आम्ही धाड टाकल्यावर पैशांची बॅग पकडली गेली. तेथे अशी स्थिती होती की आमची चाहूल लागताच बॅग फेकण्याचे व पैसे लपविण्याचेही प्रकार घडले असणार. गुन्हा घडलेला आहे, पंधरा तास उलटले तरी कारवाई झालेली नाही. ती का झाली नाही याची विचारणा करण्यासाठीच मी आज आलो आहे. अहवाल समिती चौकशी करून अहवाल सादर करणार आहे, त्यानंतर पुढील कार्यवाही होईल असे मला सांगण्यात आले, त्यामुळे हे मानण्यास मी तयार आहे, प्रशासनाच्या कार्यवाहीत मी हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे पोलिसांनी तक्रार दाखल केली पाहिजे. पोलीस तक्रारीत काय काय गुन्हे दाखल केले करतात याकडे माझे लक्ष आहे. जिथे बॅग मिळाली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असेही आम. राणे म्हणाले.
आज हा विषय देशपातळीवर गेला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जेव्हा जेव्हा जिल्ह्यात येतात तेव्हा तेव्हा सगळा माहोल बिघडवतात, चव्हाण येऊन गेल्यावर पैसा गतिमान होतो. मतदारामागे हजारो रुपये दिले जात असतील तर सामान्य व गरीब उमेदवारांनी काय करावे ? इतर उमेदवारांनी गाड्या व मंगळसूत्र गहाण ठेवून त्यातून पैसा उभारून निवडणूक लढत आहेत. असे उमेदवार कसे टिकतील ? हा पैसा येतो कुठून ? पैसे वाटपाचे हे एक सर्कल आहे, असेही आम. निलेश राणे म्हणाले.
