अँड. दिलीप नार्वेकर:काँग्रेसला सत्ता दिल्यास पाणीपट्टी व घरपट्टी ५० टक्के माफ..
⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी मोती तलाव शहरवासीयांचा श्वास आहे, मात्र या मोतीतलावाच्या मालकीवरुन न्यायालयात दावा सुरु आहे. भविष्यात हाच तलाव नगरपरिषदेच्या हातून गेल्यास सावंतवाडीचा श्वास जाईल असे मत
कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी नगराध्यक्ष ॲड.दिलीप नार्वेकर यांनी दिली.
तर जनतेने काँग्रेसच्या हातात सत्ता दिल्यास सर्वप्रथम पाणीपट्टी, घरपट्टी ५० टक्के माफ करण्याचा आमचा विचार आहे. सत्ता आल्यास निश्चितच शहरवासीयांना चांगल्या पद्धतीने सुविधा देऊ असेही ॲड.नार्वेकर म्हणाले.
ॲड. नार्वेकर यांनी नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारासह आज पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष अभय मालवणकर, राजन म्हापसेकर, संजय लाड यांच्यासह नगराध्यक्ष पदाचे उमेदवार साक्षी वंजारी नगरसेवक पदाचे उमेदवार सुनिल पेडणेकर, ॲड. राघवेंद्र नार्वेकर, समीर वंजारी, अरूण भिसे, आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, सावंतवाडीत तीन टर्म नगराध्यक्ष म्हणून काम केल. आताच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी व्हावी अशी अपेक्षा होती. त्यासाठी आम्ही प्रयत्न देखील केले होते. मात्र, ती झाली नाही मात्र आमची ताकद काय आहे हे दाखवून देण्यासाठी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत नगराध्यक्ष च्या उमेदवारासह १७ उमेदवार आमचे रिंगणात उतरविले आहेत.
या ठिकाणी आज सर्वच पक्ष विकासाच्या गप्पा मारत आहे परंतु विकासाचा प्लॅन कोणाकडेच नाही. तो प्लॅन असल्याशिवाय शहराचा विकास साध्य नाही. शहरात पार्किंगसह इतरही गैरसोय आहेत. आमची सत्ता आल्यास शहराचे योग्य नियोजन करण्याबरोबरच विविध गोष्टी आम्ही नव्याने अमलात आणणार आहोत सर्वप्रथम नागरिकांची पाणीपट्टी, घरपट्टी ५० टक्के माफ करण्याचा आमचा विचार आहे. सत्ता आल्यास निश्चितच शहरवासीयांना चांगल्या पद्धतीने सुविधा देऊ.
ते पुढे म्हणाले, सावंतवाडी नगरपालिकेचा श्वास म्हणजे मोती तलाव आहे परंतु याच तलावावर मालकीवरुन न्यायालयीन दावा सुरू आहे, न्यायालयीन झाल्यामुळे तलावाचा विकास अशक्य आहे तसेच अन्य ठिकाणी सुद्धा न्यायालयीन प्रकरणे असल्याने विकासात्मक गोष्टी मध्ये अडथळा निर्माण होतो. मल्टीस्पेशालिटीच भुमिपूजन झालं असून जागेचा प्रश्नात ते अडकले आहे. त्यामुळे आयुर्वेद कॉलेजची जागा आम्ही सुचवली. मात्र, त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. तर मोती तलाव आमचा श्वास आहे. तो गेला तर आम्ही गुदमरून मरू असंही ते म्हणाले. आज विरोधकांना सत्तेसाठी मते विकत घेण्याची वेळ आली आहे, जनता आज विकली जात आहे. एका मतासाठी १० हजार देण्याची तयारी आहे. हा माणसाचा रेट लावला जात आहे. हे विष आहे ते तुम्ही स्वीकारू नका.
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.साक्षी वंजारी म्हणाल्या, माझ्यासह नगरसेवक पदासाठीचे सर्व उमेदवाराचा विजय निश्चित आहे जनतेमधून आम्हाला भरभरून प्रतिसादही मिळत आहे. आम्ही घेतलेल्या स्वबळाच्या निर्णयाचे लोकांनी स्वागत केले. ‘डोअर टू डोअर’ आम्ही प्रचार केला असून निश्चितच कॉग्रेसला यश मिळेल.
