साक्षी वंजारी: सावंतवाडी शहरात काँग्रेस पक्षाचा माध्यमातून झंझावाती प्रचार…
⚡सावंतवाडी ता.२२-:
सावंतवाडी शहरातील नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचा झंझावाती प्रचार दिवसेंदिवस जोर धरत आहे. काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. साक्षी वंजारी यांनी शहरात डोअर टू डोअर संपर्क मोहिमेला सुरुवात केली असून नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
प्रचारादरम्यान सौ. वंजारी यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने येणाऱ्या पाच वर्षांत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या कामांचा लेखाजोखा नागरिकांसमोर मांडला. शहरातील प्रलंबित प्रश्न, पाणी-निचरा, रस्ते दुरुस्ती, आरोग्य सुविधा, स्वच्छता आणि मूलभूत सोयी-सुविधांच्या उभारणीकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
“शहराच्या समस्या सोडवण्यासाठी आम्हाला एकदा संधी द्या, आम्ही त्या मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध आहोत,” असा विश्वास यावेळी सौ. वंजारी यांनी नागरिकांना दिला. काँग्रेसच्या प्रचारात कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळत असून शहरात चांगले वातावरण तयार झाल्याचे दिसून येत आहे.
