समाज विकास व परिवर्तनासाठी भाजपची मातृत्व आधार फाउंडेशनशी घट्ट युती…

पालकमंत्री नितेश राणे:कॅबिनेट मंत्री व पालकमंत्री म्हणून मी आपल्यासोबत कसे काम करू शकतो..

⚡मालवण ता.२१–:
मातृत्व आधार फाउंडेशन सारख्या संस्था समाजपयोगी कार्यातून समाजात परिवर्तन आणण्याचे काम करतात. भाजपचे ध्येयधोरण लोकांची आणि समाजाची सेवा व मदत करणे हेच आहे. दोघांचेही हेतू व उद्दिष्ट एकच असल्याने भाजप व मातृत्व आधार फाउंडेशन एकत्र आल्यास समाजात परिवर्तन घडेल, कोणीही कोणाशी युती केली असली तरी समाज विकास व परिवर्तनासाठी भाजपची मातृत्व आधार फाउंडेशनशी घट्ट युती आहे, असे प्रतिपादन राज्याचे बंदर व मत्स्यव्यवसाय विकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी येथे बोलताना केले.

मालवण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी मालवण वायरी येथे मातृत्व आधार फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी संस्थेच्या महिला सदस्यांनी मंत्री नितेश राणे यांचे औक्षण केले. यावेळी मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक संतोष लुडबे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, अशोक सावंत, शहराध्यक्ष बाबा मोंडकर, सुहास हडकर, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शिल्पा खोत, यतीन खोत, सौ. सेजल परब, अशोक तोडणकर, आबा हडकर, रणजित देसाई, विजय केनवडेकर, मंदार केणी, दादा वेंगुर्लेकर मनोज खोबरेकर आदी व इतर उपस्थित होते.

यावेळी संतोष लुडबे यांनी प्रास्ताविक करत मातृत्व आधार फाउंडेशनच्या सामाजिक कार्यासाठी खासदार नारायण राणे व राणे कुटुंबियांनी केलेल्या सहकार्या बद्दल आभार मानले.

यावेळी पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, मातृत्व आधार फाउंडेशन उत्तमप्रकारे सामाजिक कार्य करत आहे. संस्थेचे संस्थापक संतोष लुडबे हे खासदार नारायण राणे यांच्या सोबत वर्षानुवर्षे काम करणारे जुने सहकारी आहेत. कॅबिनेट मंत्री व पालकमंत्री म्हणून मी आपल्यासोबत कसे काम करू शकतो, समाज उपयोगी कामात सहकार्य करू, हातभार कसा लावू शकतो हे समजून घेण्यासाठी मी आज येथे आलो आहे. आम्हाला तुम्ही नेता, मंत्री, आमदार समजू नका, मातृत्व आधार फाउंडेशनचे कार्यकर्ते आहोत असे म्हणून पुढचा प्रवास करायचा आहे. भाजप आणि फाउंडेशन एकत्र मिळून सिंधुदुर्गचा विकास कसा करता येईल, समाजपयोगी कार्यक्रम कसे करता येतील यासाठी काम करू. जिथे जिथे शासन व प्रशासन म्हणून मदत लागेल, आरोग्य सेवेसाही काय मदत लागेल ते सांगावे, तुम्ही मागावे आणि आम्ही ते द्यावे असा आमचा विचार आहे. कारण राणेना फोन केल्यावर नाही म्हणणे असे आमच्या डिक्शनरीत नाही, असेही मंत्री राणे म्हणाले.

मालवण नगराध्यक्ष पदासाठी सौ. शिल्पा खोत तसेच शहरातील भाजपचे उमेदवार आपणा सर्वांच्या आशिर्वादामुळे मालवण नगरपालिकेत नेतृत्व करायला जातील, तेव्हा आपल्या माध्यमातून आपल्या कामांना गती आणण्याचे काम निश्चिचित होईल, असा विश्वास व्यक्त करून मंत्री राणे पुढे म्हणाले, भाजप पक्ष दिवसाचे २४ तास आणि वर्षाचे ३६५ दिवस तुमच्या सोबत उभा आहे, असेही सांगितले.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सौ. शिल्पा खोत यांनीही विचार मांडले.

You cannot copy content of this page