⚡कुडाळ ता.२०-: कुडाळ पंचायत समितीच्या वतीने तालुक्यात यावर्षी सुमारे एक हजारपेक्षा जास्त बंधारे बांधण्यात येणार आहेत. या वनराई आणि कच्चे बंधारे कामाचा शुभारंभ उद्या २१ नोव्हेंबरला सकाळी अणाव-घाटचेपेड इथं होणार आहे. कुडाळ पंचायत समिती, ग्राम पंचायत अधिकारी संघटना, ग्राम पंचायत अणाव आणि सरपंच संघ यांच्या वतीने हा बंधारा दिन साजरा करण्यात येणार आहे. पुढील आठ दिवसात कुडाळ तालुक्यात एक हजार पेक्षा जास्त बंधारे घातले जातील अशी माहिती कुडाळचे गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी दिली.
गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी आज हि माहिती दिली. यावेळी सरपंच संघटना अध्यक्ष राजन परब, ग्रामसेवक संघटना अध्यक्ष तथा अणावचे ग्राम पंचायत अधिकारी प्रदीप नारकर, विस्तार अधिकारी कृषी संदेश परब, सहाय्यक प्रशासन अधिकारी मृणाल कार्लेकर, ग्रा प अधिकारी संघटनेचे सचिव सतीश साळगावकर आणि उपाध्यक्ष भिमराव घुगे उपस्थित होते.
श्री. वालावलकर म्हणाले, कुडाळ पंचायत समितीच्या वतीने तालुक्यात 21 ते 27 नोव्हेंबर 2025 या कालावधीत “वनराई / कच्चे बंधारे विशेष मोहिम सप्ताह” साजरा करण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ ग्रामपंचायत अणाव येथे घाटचे पेड या ठिकाणी ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या माध्यमातुन वनराई बंधारा बांधून करण्यात येणार आहे. “वनराई व कच्चे बंधारे उपक्रम हा कुडाळ तालुक्यासाठी दीर्घकालीन जलसुरक्षेचा पाया आहे. ग्रामपंचायतांनी दिलेला लक्षांक पूर्ण क्षमतेने साध्य करावा आणि लोकसहभागातून ही मोहीम आदर्श ठरवावी.” असे गटविकास अधिकारी (निवडश्रेणी) प्रफुल्ल वालावलकर यांनी आवाहन केले.
कोणताही शासकीय निधी उपलब्ध नसताना तालुक्यात निव्वळ लोकसहभाग व श्रमदानातुन या मोहिमेत १ हजारपेक्षा जास्त बंधारे बांधण्यात येणार आहेत. “वनराई व कच्चे बंधारे उपक्रमामध्ये ग्रामपंचायत अधिकारी तसेच सरपंच संघटनेने सक्रीय सहभाग घेतलेला असून इतर संघटनाना सोबत घेउन हा उपक्रम यशस्वी करण्याचा निर्धार केलेला आहे असे प्रतिपादन सरपंच संघटना अध्यक्ष राजन परब व ग्रामपंचायत अधिकारी संघटना अध्यक्ष प्रदिप नारकर व सचिव सतिश साळगावकर व पदाधिकारी यांनी केले आहे.
सन 2024-25 मध्ये लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या कच्चे बंधारे मोहिमेचे व्यापक यश मिळाले होते. गतवर्षी या मोहिमेमध्ये एकूण १०७० बंधारे बांधून पूर्ण केलेले होते. यामुळे कुडाळ तालुक्यात पाणीटंचाईची परिस्थिती उदभवली नाही. चालू वर्षीही मोहीम अधिक मोठ्या प्रमाणावर राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
दरम्यान संदर्भीय आदेशानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी कच्चे बंधारे बांधणीचे स्वतंत्र लक्षांक निश्चित करण्यात आले आहेत. पंचायत समितीने लक्षांक 100% साध्य करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे.
ग्रामपंचायतींनी आपल्या हद्दीत ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक लोकप्रतिनिधी, प्राथमिक व माध्यमिक शाळा / हायस्कूल, युवक क्रीडा मंडळे, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, कर्मचारी संघटना या घटकांचा सहभाग सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. या सर्वांच्या सहभागातून तालुक्यात जलसंधारणाची शाश्वत पायाभरणी करण्याचा प्रशासनाचा उद्देश आहे, असे श्री. वालावलकर यांनी सांगितले.
कुडाळ प.स. तर्फे उद्यापासून वनराई कच्चे बंधारे विशेष मोहिम सप्ताह…
