कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार ) पक्षाची युती झाली आहे. मी नगराध्यक्षपदासाठी तर प्रभाग क्रमांक १७ मधून नगरसेवकपदासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक हे निवडणूक लढवत आहेत. गत निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी मला या प्रभागातून मताधिक्य मिळाले होते.
यंदाही मला व अबिद नाईक यांना मताधिक्य मिळून आम्ही दोघेही विजय होणार आहोत. भाजपने शहरात केलेल्या विकासकामांमुळे पुन्हा एकदा न. पं. वर भाजपचा झेंडा फडकेल, असा विश्वास भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक १७ मधील राष्ट्रवादीचे उमेदवार अबिद नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ कनकनगर येथे झाला. याप्रसंगी श्री. नलावडे बोलत होते. यावेळी अबिद नाईक, राष्टÑवादी युवकचे जिल्हाध्यक्ष निशिकांत कडुलकर, राजू गावणकर, रवीद्र उर्फ बाबू गायकवाड आदी उपस्थित होते.
श्री. नलावडे म्हणाले, न. पं. निवडणुकीसाठी भाजप व राष्ट्रवादी (अ.पा) युती झाली आहे. त्यानुसार प्रभाग १७ मध्ये आम्ही प्रचाराचा शुभारंभ केला. शहरात सध्या निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजप पक्ष विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढवत आहे.
विरोधकांच्या टीका, टिप्पणीला आम्ही प्रत्युत्तर न देता आम्ही विकासाच्या नावावर मतदारांकडे आम्हाला पुन्हा सत्ता देण्याचे आवाहन करीत आहोत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपचे कमळ फुलणार आहे, असे नलावडे यांनी सांगितले.
