१४, १६ वर्षाखालील मुलींचे होणार स्पोर्ट टॅलेंट सर्च…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३० नोव्हेंबरला निवड चाचणी: अस्मिता लीग टॅलेंट सर्चचे आयोजन..

⚡ओरोस ता २०-: १४ वर्षांखालील आणि १६ वर्षांखालील मुलींसाठी विविध अॅथलेटिक्स प्रकारांत निवड चाचणी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार आहेत. ३० नोव्हेंबर रोजी ही चाचणी पार पडणार असून जिल्ह्यातील शाळांनी, पालकांनी आपल्या मुलींना यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी करून घ्यावे असे आवाहन, सिंधुदुर्ग जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशन सचिव कल्पना तेंडुलकर यांनी केले आहे.
याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशन सचिव कल्पना तेंडुलकर यांनी गुरुवारी दुपारी जिल्हा परिषद पत्रकार कक्षात पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. यावेळी स्पर्धा प्रमुख बाळकृष्ण कदम उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना कल्पना तेंडुलकर यांनी, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया आणि अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “अस्मिता लीग – टॅलेंट सर्च” कार्यक्रमासाठी संपूर्ण देशातील ३०० जिल्ह्यांची निवड झाली असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचाही त्यात समावेश आहे. जिल्ह्यातील मुलींना अॅथलेटिक्समधील कौशल्य दाखविण्याची ही महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. १४ वर्षांखालील आणि १६ वर्षांखालील मुलींसाठी विविध अॅथलेटिक्स प्रकारांत निवड चाचणी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार आहेत.
१४ वर्षांखालील मुलींसाठी तीन प्रकारचे ट्रायाथलॉन होणार आहेत. त्या पैकी कोणताही एक प्रकार निवडणे बंधनकारक असून यासोबतच किड्स जेव्हलिन (भाला फेक) हा इव्हेंटही अनिवार्य आहे. १६ वर्षांखालील गटातील मुलींसाठी 60 मीटर, 600 मीटर धावणे, उंच व लांब उडी, थाळी फेक, 3 किलो गोळाफेक व 500 ग्रॅम भाला फेक असे सात प्रकार ठेवण्यात आले असून त्यापैकी कोणतेही दोन इव्हेंट निवडण्याची मुभा देण्यात आली आहे, असे यावेळी कल्पना तेंडुलकर यांनी सांगितले.
या निवड चाचणीकरिता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना प्रमाणपत्र व पदक देण्यात येणार आहे. ही स्पर्धा ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सिंधुदुर्गनगरी येथील क्रीडा संकुल येथे होणार असून जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील मुलींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कल्पना तेंडुलकर व स्पर्धा प्रमुख बाळकृष्ण कदम यांनी केले आहे.

फोटो ओळ: सिंधुदुर्गनगरी:

You cannot copy content of this page