रुपेश राऊळ:पालकमंत्र्यांनी सावंतवाडीकरांना दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झाली नाहीत,तर केसरकारांनी आजपर्यंत नारळ फोडण्याच काम केलं..
⚡सावंतवाडी ता.१८-: “आम्ही जनशक्ती घेऊन मैदानात उतरलो आहोत आणि सावंतवाडीची जनता यावेळी धनशक्तीला पराभूत करेल,” असा ठाम विश्वास ठाकरे शिवसेना विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.दरम्यान
नगराध्यक्ष पोटनिवडणुकीदरम्यान पालकमंत्र्यांनी सावंतवाडीकरांना दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झाली नाहीत. “एकही काम प्रत्यक्षात उतरलेले नाही. जनतेने याचा विचार करून अशा लोकांना घरी बसवण्याची वेळ आली आहे. सावंतवाडी शहराला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे राऊळ म्हणाले.
ते पुढे म्हणाले “आम्ही जनतेसमोर जे शब्द देऊ, ते पूर्ण करण्याची हमी आम्ही देतो. त्यामुळे आमच्या उमेदवाराला यावेळी संधी द्यावी,” असे आवाहन त्यांनी केले.
केसरकरांवर टीका करताना राऊळ म्हणाले की, “आजपर्यंत त्यांनी फोडलेले अनेक नारळ आजही अपूर्ण कामांचे प्रतीक आहेत. याचा गांभीर्याने विचार करून जनतेने आम्हाला साथ द्यावी.”तसेच राजघराण्याचा आम्ही आदर करतो; मात्र भाजप ज्या प्रकारचे राजकारण करत आहे त्याला जनता कंटाळली आहे, असा आरोपही त्यांनी केला. “सावंतवाडीच्या जनतेने आम्हाला पुढील पाच वर्ष संधी दिल्यास शहराच्या विकासासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम करू,” असा विश्वास राऊळ यांनी व्यक्त केला.
दरम्यान, “केसरकरांना लोकांनी प्रश्न सोडवण्यासाठी संधी दिली, मंत्रीपदही दिले, तरीही त्यांना एकही ठोस काम साध्य करता आले नाही, हे दुर्दैवी आहे,” अशी टीकाही राऊळ यांनी केली.
