आम. निलेश राणे:शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली..
⚡मालवण ता.१७-:
बाळासाहेब ठाकरे हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नव्हते, ते एक विचार आहेत आणि महाराष्ट्रासाठी उभा केलेला अस्मितेचा भक्कम ध्वज आहेत. जनतेच्या हक्कांसाठी लढण्याची, न्यायासाठी ठाम उभं राहण्याची आणि धर्म, संस्कृती व महाराष्ट्राच्या अस्मितेचे रक्षण करण्याची बाळासाहेबांची तत्व आजही आमच्या कार्याचा पाया आहेत, असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने शिवसेनेच्यावतीने मालवण येथील राजकोट किल्ल्यावर अभिवादन कार्यक्रम पार पडला. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस आमदार निलेश राणे व शिवसैनिकांनी पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्य, विचार आणि अटल नेतृत्वाला आदरांजली वाहिली.
बाळासाहेब ठाकरे यांची निर्भीड भाषा, जनतेसाठीची निश्चययुक्त भूमिका आणि शिवसैनिकांवरील अपरंपार प्रेम आजही प्रत्येक शिवसैनिकाला प्रेरणा देते. आजच्या या पुण्यतिथीच्या दिवशी मालवणच्या भूमीत उभं राहून त्यांच्या शिकवणीची पुन्हा एकदा आठवण करण्यात आली. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि शिकवणुकीने प्रेरित होऊन, मालवणच्या विकासासाठी, शिवसेनेच्या तत्त्वांसाठी आणि महाराष्ट्राच्या गौरवासाठी आम्ही सदैव समर्पित राहू, असे सांगत आमदार राणे यांनी बाळासाहेबांना अभिवादन केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर, जिल्हा सचिव दादा साईल, उमेश नेरुरकर, राजा गावकर, बबन शिंदे, मोहन वराडकर, महिला जिल्हाप्रमुख सौ. दीपलक्ष्मी पडते, स्वप्नाली नेरुरकर, सौ. ममता वराडकर, दीपक पाटकर, महेश सारंग, नरेश हुले, मेघा गावकर, राजू बिडये, यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
