मालवणातील मरीन सेंच्युरी प्रश्न स्थानिकांना विचारात घेऊनच सोडविणार..
⚡मालवण ता.०६-:
मालवण मरीन सेंच्युरी रद्द करणे सोपे काम नाही. स्थानिक परिस्थिती विचारात घेता, वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने या सेंच्युरीचे क्षेत्र तितकेच ठेवून पुनर्रचना केली आहे. स्थानिक उपजीविकेच्या घटकांना विचारात घेऊनच मालवण मरीन सेंच्युरीला मूर्त स्वरूप दिले जाणार असल्याची माहिती राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कांदळवन विभाग) एस. व्ही. रामाराव यांनी देवबाग येथे कार्यशाळेत बोलताना दिली.
देवबाग येथे ओशन ब्लिस हॉटेलच्या सभागृहात कांदळवन विभाग, वनविभाग, कांदळवन प्रतिष्ठान आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने समुद्री जीवांबाबत प्रतिसाद आणि संवर्धन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रादेशिक वन अधिकारी (सामाजिक वनीकरण) वर्षा कोळेकर, उपसंचालक कांदळवन प्रतिष्ठान मानस मांजरेकर, डी. एफ. ओ. राजेंद्र मगदूम, डॉ. दिनेश विन्हरकर, विभागीय वन अधिकारी (दक्षिण कोकण) कांचन पवार, उपसंचालक वेटलैंड्स प्रोग्राम BNHS डॉ. सथियासेल्वम, सहाय्यक वनसंरक्षक कांदळवन विभाग (दक्षिण कोकण) प्रियंका पाटील, सुनील सावंत, सत्यवान सुतार, परिमंडळ वन अधिकारी संदीप कुंभार, सुहास पाटील, वनक्षेत्रपाल मोहन उपाध्ये, श्रीरंग परीट, सदानंद परब, सावळा कांबळे, वनपाल, एमएमबी, मत्स्य विभाग, अधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री. रामाराव म्हणाले, किनारपट्टीवरील सागरी जीवांचे रक्षण, संवर्धन करण्यासाठी कांदळवन विभाग कटिबद्ध आहे. स्थानिकांचा सहभाग वाढणे आवश्यक आहे. कांदळवन विभाग आणि स्थानिकांमध्ये सुसंवाद निर्माण झाला पाहिजे. यासाठी स्थानिक पंर्यावरणमित्र आणि प्रशासनाच्या संबंधित विभागाचे अधिकारी मिळून एक व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. या माध्यमातून दर तीन महिन्यातून किमान एकदा बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. जखमी सागरी जीवांसाठी तत्काळ उपचार मिळत नसल्यामुळे स्थानिक पातळीवर उपचार केंद्र सुरू करा. यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी आणि प्राणी अॅम्ब्युलन्स उपलब्ध करण्यात येईल. सागरी जीवांच्या बचाव कार्यात स्थानिकांना अनेकदा अडचणी येतात, याकरिता रेस्क्यू उपकरणे खरेदीसाठी मंजुरी देण्यात येत आहे, असेही रामाराव म्हणाले.
मालवण वन परिक्षेत्रामधील सर्व रिक्त पदे तातडीने भरण्यात येणार असून स्थानिकांशी संवाद साधण्यासाठी दर तीन महिन्यातून एकदा विभागामार्फत बैठक घेण्यात येणार असल्याची माहितीही श्री. रामाराव यांनी दिली. चर्चासत्रात अक्षय रेवंडकर, आनंद बांबर्डेकर आदी सदस्यांनी भाग घेतला.
