जत्रोत्सव दक्षिण कोकणच्या पंढरपूरचा…

*जत्रोत्सव सोनुर्लीच्या श्री देवी माय माऊलीचा

*💫सावंतवाडी दि.०१ विनय वाडकर-:* दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळख प्राप्त असलेले सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावच्या श्री माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव आज मंगळवार १ डिसेंबर रोजी होत आहे. दक्षिण कोकणचे आराध्य दैवत म्हणून श्री देवी सोनुर्ली माऊली ची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे. अशा या माय माऊलीचा जत्रोत्सव म्हणजे तिच्या प्रिय भक्तगणांनसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. राज्यभरातून तसेच इतर राज्यातून लाखो करोडो भाविक या दिवशी तिचे दर्शन घेण्यासाठी येतात आणि तिच्या चरणी लीन होतात. लोटांगणाची जत्रा म्हणून या जत्रेला ओळख प्राप्त आहे. देवीच्या समोर केलेले नवस पूर्ण झाल्यावर भक्तगण भक्तिपूर्ण भक्तिभावाने लोटांगण घालून नवस फेडतात. हा लोटांगण सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा असतो. प्रथम पुरुष आणि त्यानंतर महिला असे दोघेही लोटांगण घालतात. जत्रेच्या दुसऱ्या दिवशी तुळाभार कार्यक्रम पार पडतो. यामध्ये नवस केलेले भाविक आपले नवस पूर्ण करण्यासाठी तुळाभार करतात. श्री देवी माऊलीचे भाविक आपापल्या परीने तिच्या चरणी बोलले नवस पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. या देवीचा जत्रोत्सव लाखो भक्तांच्या गर्दीत तीन दिवस चालतो. परंतु सद्या संपूर्ण जगासोबत भारतात पसरलेली कोरोना या महाभयंकर आजाराच्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या जत्रोत्सव फक्त मानकऱ्यांच्या उपस्थितीत अतिशय साध्या पद्धतीत पार पडणार असून जत्रेस येण्यास भाविकांनी टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. यावर्षीचा जत्रोत्सव हा प्रशासनाने घालून दिलेल्या अटी शर्तीचे पालन करून पार पडणार आहे. दक्षिण कोकणची आई असणाऱ्या माय माउली श्री माऊली देवी चरणी जत्रोत्सवानिमित्त ग्लोबल महाराष्ट्र चा साष्टांग दंडवत

You cannot copy content of this page