कणकवली : तालुक्यातील साळीस्ते येथील रस्त्याच्या बाजूला बेंगलोर (कर्नाटक) येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी (वय ५६) यांचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणातील चार संशयित आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेला काही दिवस उलटून गेले असले तरी, खून प्रकरणामागचे नेमके कारण अद्याप उघडकीस आलेले नाही.
कणकवली पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या संयुक्त पथकाने बेंगलोरसह कर्नाटकातील विविध ठिकाणांहून चार संशयितांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मधुसूदन सिद्धय्या तोकला (५२, रा. बेंगलोर), सुभाष सुब्बारायाप्पा एस. (३२), नरसिमहा नारायणस्वामी मूर्ती (दोघेही रा. कोलार) आणि मनु पी. बी. (रा. रामनगर, कर्नाटक) या चार जणांचा समावेश आहे.
आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर सुरुवातीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ती मुदत संपल्यानंतर तपासाच्या अनुषंगाने न्यायालयाने कोठडीची दोन दिवसांची वाढ केली आहे. मात्र या प्रकरणाबाबत पोलिसांकडून अद्याप कोणताही ठोस खुलासा करण्यात आलेला नाही. खून नेमका कुठे झाला? त्यामागे आर्थिक, वैयक्तिक की कौटुंबिक कारण होते? हा सुपारीखून होता का? या सर्व प्रश्नांवर अद्यापही पडदा आहे. डॉ. श्रीनिवास रेड्डी यांच्या खून प्रकरणाचा तपास गुप्ततेच्या पडद्यामागेच सुरू असल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. पोलिसांच्या पुढील तपासातून या प्रकरणातील रहस्य उलगडण्याची उत्सुकता वाढली आहे.
