⚡मालवण ता.१३-:
पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या मालवण बंदर जेटीवर बेंच, लाईट्स व सुसज्ज स्वच्छता गृह अशा विविध सोयी सुविधांची आवश्यकता असून याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधीनी लक्ष द्यावे, अशी मागणी मालवण मधील सामाजिक कार्यकर्ते नितेश पेडणेकर यांनी केली आहे.
मालवण बंदरात नवीन जेटी उभारण्यात आली असून जुन्या जेटीचेही नूतनीकरण करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग किल्ला दर्शनाच्या निमित्ताने दोन्ही जेटीवर पर्यटकांची मोठी वर्दळ असते. मात्र जेटीवर बसण्यासाठी बेंच सुविधा नसल्याने ज्येष्ठ व महिला पर्यटकांची गैरसोय होत आहे. याबाबत पर्यटकांमधूनही नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे दोन्हीही जेटीवर बेंचची सोय करण्यात यावी अशी मागणी नितेश पेडणेकर यांनी केली आहे. तसेच दोन्हीही जेटीवर आवश्यक लाईट व्यवस्था तसेच डेकोरेटिव्ह लाईट्स लावण्यात यावेत, जेणेकरून रात्रीच्या वेळी फेरफटका मारण्यास येणाऱ्या स्थानिक नागरिक व पर्यटकांची गैरसोय दूर होईल. तसेच लाईट्स मुळे रात्रीच्यावेळी जेटीच्या सौंदर्यातही भर पडेल. तसेच जेटी परिसरात स्वच्छता ठेवण्यात यावी. त्याच प्रमाणे बंदर जेटी परिसरातील स्वच्छता गृहाची दुरावस्था झाली असून मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांची गरज लक्षात घेऊन या स्वच्छता गृहाची दुरुस्ती करून त्यामध्ये आवश्यक प्रसाधन सुविधा निर्माण करण्यात यावी, अशी मागणीही नितेश पेडणेकर यांनी केली आहे.
