सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयुष्मान भारत व वयवंदना योजना कार्ड उपक्रमाला गती; एका दिवसात ४५०० कार्ड निर्मिती…

सिंधुदुर्गनगरी ता १३
पालक सचिव विरेंद्र सिंह यांच्या नुकत्याच झालेल्या जिल्हा दौर्‍यात त्यांनी आरोग्यविषयक विविध सूचना देण्यात आल्या. त्यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात आयुष्मान भारत आणि वयवंदना योजना कार्ड उपक्रमाला गती मिळाली आहे. जिल्ह्यात शनिवारी एका दिवसात तब्बल ४५०० आयुष्मान कार्ड काढण्यात आली. तर आतापर्यंत ४ लाख ६५ हजार १९३ कार्ड काढण्यात आली आहेत. तसेच जिल्ह्यातील ३२ गावांमध्ये आयुष्मान भारत आणि वयवंदना योजना कार्ड काढायचे काम १०० टक्के पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आयुष्मान भारत योजनेचे समन्वयक डॉ. प्रवीण गोरुले, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदी उपस्थित होते. यावेळी श्री. खेबुडकर म्हणाले की, पालक सचिव विरेंद्र सिंह यांच्या नुकत्याच झालेल्या जिल्हा दौर्‍यात त्यांनी आरोग्यविषयक विविध सूचना केल्या होत्या. त्यांनी आयुष्मान भारत कार्ड आणि वयवंदना योजना कार्ड काढण्याकडे लक्ष देण्याची सूचना केली होती. त्यानुसार शनिवारी प्रत्येक तालुक्यातील दहा गावे निवडून त्याठिकाणी शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमधून मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी सहभागी होत कार्ड काढली.
तसेच रविवारी एका दिवसात तब्बल ४,५०० आयुष्मान भारत कार्ड काढण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण ८,१४,४७९ पात्र नागरिकांपैकी आतापर्यंत ४,६५,१९३ नागरिकांची आयुष्मान भारत कार्ड तयार झाली आहेत. यातील ३२ गावे आयुष्मान भारत व वयवंदना योजना कार्ड निर्मितीमध्ये १०० टक्के पूर्ण झाली आहेत.
जिल्ह्यात सध्या २९ रुग्णालयांचा समावेश आयुष्मान भारत योजनेत असून, लवकरच आणखी रुग्णालयांचा समावेश होणार असल्याची माहिती देण्यात आली.

आयुष्यमान भारत आणि वयवंदना योजना कार्ड काढा

७० वर्षांवरील नागरिकांसाठी सुरू असलेल्या वयवंदना योजना अंतर्गत लाभार्थ्यांना आयुष्मान भारत योजनेच्या ५ लाख लाभाबरोबरच वयवंदना अंतर्गत आणखी ५ लाखांचे मोफत वैद्यकीय उपचार मिळणार आहेत. म्हणजेच एकूण १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड सर्व नागरिकांनी काढून घ्यावे . असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले.

You cannot copy content of this page