*डंपर चालकाच्या पायास गंभीर दुखापत; पोल तुटल्याने विद्युत पुरवठा देखील विस्कळीत*
*💫मालवण दि.०८-:* कुडाळ- धामापूर मालवण मार्गावरुन भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने धामापूर भावई मंदिर नजीक रस्त्याकडेला असलेल्या विद्युत पोलला जोरदार धडक दिल्याची घटना आज शनिवारी सकाळी घडली. या धडकेत विद्युत पोलचे तुकडे झाले तर डंपरची केबिन चेपल्याने चालकाच्या पायास गंभीर दुखापत झाली. तसेच परिसरातील विद्युत पुरवठाही विस्कळीत झाला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास गोवा येथून मालवण आंबेरी येथे वाळू भरण्यासाठी जाणारा डंपर (क्रमांक GA- 09 , U – 3455) धामापूर भावई मंदिर नजीक आला असताना चालकाचा डंपरवरील ताबा सुटला आणि रस्त्याशेजारी असलेल्या दगडी कुंपणाला भरधाव डंपरची जोरदार धडक बसली. त्याठिकाणी असलेल्या विद्युत पोलला धडकून डंपर थांबला. या अपघातात विद्युत पोलाचे दोन तुकडे झाले. तर डंपरच्या केबीनचा चक्काचुर होऊन चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि तो केबीनमध्ये अडकून पडला. अपघाताच्या आवाजाने घटनास्थळी जमलेल्या स्थानिक तरुणांनी अडकलेल्या चालकास बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. विद्युत पोल मोडल्यामुळे विद्युतवाहिन्या लोंबकळत राहिल्याने काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, वीज वितरणचे कर्मचारी मिथुन जावकर आणि सागर गावठे यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने विद्युत प्रवाह खंडीत केला आणि तुटलेल्या वीज वाहीन्या बाजूला करून रस्ता वाहतूकीसाठी मोकळा करून दिला. याच ठिकाणच्या पोलला डंपरने धडक देऊन नुकसान करण्याची ही तिसरी घटना आहे. चौके- धामापूर- कुडाळ या मार्गावर दररोज शेकडो डंपर वाळू आणि चिरे वाहतूक करतात. त्यापैकी काही डंपरचालक नेहमी भरधाव वेगात डंपर चालवितात आणि या मार्गावर वारंवार अपघात होत असतात. काही दिवसांपूर्वीच भल्या पहाटे धामापूर येथील किराणा दुकानदार ताता आजगावकर यांच्या दुकानासमोरील पत्रेच लोखंडी फ्रेमसहीत डंपरच्या धडकेने उखडून पडले होते. त्यामुळे अशाप्रकारे बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्या डंपर चालकांवर प्रशासन व पोलिसांनी वेळीच कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.