⚡सावंतवाडी ता.०५-: केरवडे-कुडाळ येथून बेकायदेशीर आणि निर्दयीपणे गोवंश वाहतूक करणारा प्रयत्न सावंतवाडी पोलिसांनी कोलगाव येथे उधळून लावला. या प्रकरणी पोलिसांनी वाहनचालकासह एका ६४ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, MH 04 EC 7683 या क्रमांकाच्या बोलेरो मॅक्सि वाहनातून रघुनाथ जाधव (वय ६४, रा. भुदरगड, जि. कोल्हापूर) आणि चालक सागर गुरव (रा. भुदरगड, जि. कोल्हापूर) हे दोघे दोन गायी आणि त्यांची अवघी सात दिवसांची दोन वासरे यांची विनापरवाना वाहतूक करत होते.
पोलिसांनी कोलगाव येथे केलेल्या तपासणीत ही वाहतूक केरवडे-कुडाळ मार्गे भुदरगड (कोल्हापूर) येथे जात असल्याचे निष्पन्न झाले. जनावरांची वाहतूक करताना ‘प्राण्यास निर्दयतेने वागविणे’ या कायद्याचे उल्लंघन केल्याचे आणि कोणत्याही प्रकारचा आवश्यक परवाना नसल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणी, सावंतवाडी पोलिसांनी रघुनाथ जाधव आणि चालक सागर गुरव यांच्याविरुद्ध ‘प्राण्यास निर्दयतेने वागविणे’ आणि विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली. दरम्यान, गोवंश वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले बोलेरो मॅक्सि वाहन जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या दोन गायी आणि दोन वासरे यांची पुढील चारा-पाण्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांना जवळच्या गोशाळेत सोडण्यात आले आहे. गोवंश तस्करांचे धाडस वाढू नये यासाठी गो-रक्षक, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी देखील सावंतवाडी पोलिस ठाण्यात हजेरी लावली होती.
