Headlines

सिंधुदुर्ग महाविद्यालयात डिजिटल साक्षरता व पर्यावरण जनजागृतीचा जागर

मालवण (प्रतिनिधी)

कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथे अकाउंटन्सी अँड कॉमर्स विभाग, कॉमर्स असोसिएशन आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच एशियन इन्फोटेक, मालवण यांच्या सहकायनि डिजिटल साक्षरता, पर्यावरण जनजागृती आणि ‘बेसिक्स ऑफ जीएसटी या उपक्रमांतर्गत प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी ‘Basics of GST’ अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि सॅनिटरी पॅड-डायपर विल्हेवाटीच्या सर्वेक्षणाचा संकल्प यावेळी करण्यात आला.

महाविद्यालयाच्या डिजिटल क्लासरूममध्ये झालेल्या या समारंभात व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या वैशाली जुवेकर, राजाराम जुवेकर, अॅड. रुपाली पाटील, प्रभारी प्राचार्य कैलास राबते, डॉ. मल्लेश खोत, डॉ. हंबीरराव चौगले, प्रा. रामचंद्र तावडे, प्रा. योगिता सावंत आणि दीक्षा मालवणकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एशियन इन्फोटेक कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटरच्या वैशाली जुवेकर व राजाराम जुवेकर तसेच सामाजिक कार्यकर्त्या अॅड. रुपाली पाटील यांचे प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि एनएसएस स्वयंसेवक उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना जीएसटी विषयाचे केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता त्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने ‘बेसीक ऑफ जीएसटी’ या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली असून एशियन इन्फोटेकच्या सहकार्याने हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आल्याचे यावेळी अकाउंटन्सी अँड कॉमर्स विभागप्रमुख तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. सुमेधा नाईक यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांनी डिजिटल साक्षरता, पर्यावरण जनजागृती आणि जीएसटी सारख्या कौशल्याधारित अभ्यासक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांच्या ज्ञानासोबतच त्यांची कौशल्ये आणि सामाजिक जाणीव विकसित करणारे विविध अभिनव उपक्रम अकाउंटन्सी अँड कॉमर्स विभाग आणि एनएसएसच्या माध्यमातून सातत्याने राबवावेत, असे त्यांनी सांगितले. डिजिटल साक्षरतेवर मार्गदर्शन करताना वैशाली जुवेकर यांनी, विद्यार्थ्यांनी केवळ स्मार्ट मोबाइलचा वापर करणारे न राहता स्वतःही ‘स्मार्ट’ आणि डिजिटलदृष्ट्या सजग होणे आवश्यक असल्याचे सांगितले. इंटरनेटचा वापर करताना विविध प्रकारच्या डिजिटल फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले.

रुपाली पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलतेचे महत्त्व अधोरेखित केले. वेंगुर्ले येथे दिव्यांग पालकांसाठी ‘साहस प्रतिष्ठान’ असलेल्या अॅड. पाटील यांनी आपल्या या संस्थेच्या माध्यमातून कार्यरत कुटुंबात किंवा आजूबाजूच्या परिसरात दिव्यांग व्यक्ती असल्यास त्यांच्याप्रती संवेदनशील आणि सजग राहण्याचे आवाहन केले. दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण, कायदेविषयक बाबी किंवा रोजगारासंदर्भात कोणतीही अडचण असल्यास संस्थेशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. योगिता सावंत यांनी केले. प्रा. रामचंद्र तावडे यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. सुमेधा नाईक, प्रा. रामचंद्र तावडे आणि प्रा. योगिता सावंत यांनी परिश्रम घेतले. हर्षद पाटकर आणि गौतम मानवर अपूर्वा पालव, रिद्धी काजरेकर, यांनी नियोजनात सहकार्य केले, हेमांगी चव्हाण, रिद्धी केळुसकर, सोहम भोगले, वेदान्त कुपकर, गावडे, अथर्व कुपकर, जगदीश कीर, पप्पूकुमार यादव, पार्थ तावडे, प्राची दुर्वा चव्हाण, राधाकृष्ण मालंडकर आदी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सहकार्य केले.

You cannot copy content of this page