महेश कांदळगावकर:गतवर्षीप्रमाणे आचारसंहितेचे कारण नको…
⚡मालवण,ता.०४-:
मालवण शहरातील अपंग बांधवांना शासनाच्या धोरणानुसार मिळणारा पाच टक्के अपंग निधी दिवाळी सणापूर्वीच वितरित करण्यात यावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर यांनी पालिकेच्या प्रशासनाकडे केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमुळे गतवर्षीप्रमाणे आचारसंहितेचे कारण दाखवून निधी वाटप लांबणीवर टाकू नये असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मालवण पालिका हद्दीत सुमारे १२० अपंग बांधव आहेत. त्यांना त्यांच्या अपंगत्वाच्या प्रमाणानुसार दरवर्षी सुमारे ९ लाख रुपयांचा अपंग निधी मिळणे अपेक्षित असते. हा निधी शक्यतोवर गणेश चतुर्थी आणि दिवाळी या सणांच्या काळात वितरित करण्याची परंपरा आहे.
परंतु, गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे कारण पुढे करून हा निधी थांबवण्यात आला होता. त्यामुळे अपंग बांधवांना तो निधी निवडणुकांचा कार्यक्रम संपल्यानंतर जानेवारी महिन्यात मिळाला होता. सद्यस्थितीत नजीकच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आचारसंहितेमुळे निधीचे वाटप लांबणीवर पडू नये अशी मागणी श्री. कांदळगावकर यांनी केली आहे.
कांदळगावकर यांच्या मागणीनंतर नगरपरिषद प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. प्रशासनाने लवकरात लवकर अपंग निधी वितरित केला जाईल, असे आश्वासन दिले आहे. अपंग बांधवांना दिवाळीसारख्या मोठ्या सणासुदीच्या काळात हा निधी मिळाल्यास मोठी मदत होणार आहे.
दरम्यान, ही बाब आमदार निलेश राणे यांच्या निदर्शनासही आणून देण्यात आल्याचे श्री. कांदळगावकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
