पालकमंत्री विविध तपास यंत्रणांच्या माध्यमातून चौकशी लावतायत…

राजन तेली:पोलीस प्रशासन पालकमंत्र्यांच्या दबावाला झुकले नाही..

कणकवली : सत्ता असल्‍याने जिल्ह्याचे पालकमंत्री विविध तपास यंत्रणांच्या माध्यमातून माझी चौकशी लावत आहेत. पण मी घाबरत नाही. कुठल्‍याही तपास यंत्रणांना सामोरे जाण्यास तयार आहे. पोलिसांवर दबाव आणून माझ्यावर कारवाईचा प्रयत्‍न झाला. पण पोलीस प्रशासन पालकमंत्र्यांच्या दबावाला झुकले नाहीत. आता सीबीआयची भीती दाखवली जातेय. पण आम्ही घाबरत नाही. तसेच सीबीआयची मला कुठलीही नोटीस मिळालेली नाही असे प्रतिपादन माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे केले. येथील आपल्‍या निवासस्थानी श्री.तेली यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्‍हणाले, जिल्‍हा बँकेकडून नियमबाह्य पद्धतीने कर्ज वाटप सुरू आहे. बँकेच्या अध्यक्षाच्या पीए ला २० हजार मानधन आहे. पण त्‍याला साडे सात कोटींचे कर्ज दिलंय. अनेक साखर कारखान्यांना ९०० कोटी रूपये कर्ज वितरण झालंय. यातील अनेक कारखाने आजारी आहेत. पालकमंत्र्यांच्या संस्थांनाही कोट्यवधींचे कर्ज वाटप झालंय. या सर्व गैर प्रकाराविरोधात मी नाबार्ड आणि इतर संस्थांकडे तक्रारी केल्‍या. त्‍यानुसार बँकेला चौकशीच्या नोटिसा देखील आल्‍या. त्‍यामुळे मी भाजपमध्ये असतानाच मला २०२२ मध्ये बँकेकडून नोटिस आली होती. तेली म्‍हणाले, मी उद्योजक आहे, त्‍यामुळे कर्ज घेतले आहे. यातील ९ कोटी ५१ लाख २५ हजार रूपयांचे कर्ज फेड देखील केलं आहे. व्यवसायात चढ उतार असतात. त्‍यामुळे एक दाेन हप्ते थकतात. माझी कर्जफेड करण्याची मुदत २०३३ आहे. असे असतानाही मला नोटिसा पाठवून जिल्‍हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि पालकमंत्री त्रास देण्याचा प्रयत्‍न करत आहेत. विविध यंत्रणांच्या माध्यमातून माझी चौकशी लावली जात आहे. पण मी सर्व तपास यंत्रणांच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे.. जिल्‍हा बँकेकडून अनेक संस्था, व्यक्‍तींना नियम डावलून, अधिकारी, कर्मचाऱ्यांवर दबाव आणून कर्ज वाटप करण्यात आले आहे. याबाबत मी अनेक संस्थांकडे तक्रारी केल्‍या आहेत. या तक्रारींची दखल न घेतल्‍यास उच्च न्यायालयात दाद मागणार असल्‍याचा इशाराही श्री.तेली यांनी दिला.

You cannot copy content of this page