मालवण मातृत्व आधार फाउंडेशनतर्फे बाजारपेठेतील ५० महिलांचा ‘नवदुर्गा सन्मान’…!

⚡मालवण ता.२६-:
मालवण मधील मातृत्व आधार फाउंडेशन ही सेवाभावी संस्था नवरात्री निमित्त समाज सुधारणेसाठी, समाज प्रबोधनासाठी आणि सर्वसामान्य महिलांच्या मदतीसाठी कार्य करत असून याच अनुषंगाने मालवण बाजारपेठेत फुले विक्री करणाऱ्या घुमडे येथील ७५ वर्षीय सौ. अंजली अशोक बिर्जे म्हणजेच मालवणवासियांना परिचित असलेल्या शकू फुलवाली यांच्यासह अन्य फुले, भाजी, फळ व मत्स्य विक्री करणाऱ्या ५० महिलांचे पूजन करून मातृत्व आधार फाउंडेशन तर्फे सन्मान करण्यात आला.

नवरात्रीनिमित्त मातृत्व आधार फाउंडेशनच्या महिला संघटनातर्फे मालवण मधील विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान तसेच गरजू महिलांना मदत करण्याचा नवदुर्गा सन्मान हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मालवण बाजारपेठेत गेली ४० वर्षे फुले, हार व फुलांच्या वेण्या विक्री करणाऱ्या सौ. अंजली बिर्जे उर्फ शकू टेंबूलकर यांनी अथक मेहनतीने आपल्या कुटुंबाचा चारितार्थ चालवीला आहे. त्यांच्यासह मालवण बाजारपेठेत मालवणसह आजूबाजूच्या गावातून अनेक महिला फळ, भाज्या व फुले विक्रीसाठी येतात. तसेच अनेक महिला मासे विक्री करतात. या अशा एकूण ५० विक्रेत्या महिलांचा संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला. या महिलांचे पूजन करून व ओटी भरून त्यांना भेट वस्तू देण्यात आल्या. या सन्मानाने महिला भारावून गेल्या.

यावेळी सौ. स्मृती कांदळगावकर यांनी मातृत्व आधार फाउंडेशनच्या उपक्रमाची माहिती दिली. विक्रेत्या महिलांनी या सन्मानाबद्दल संस्थेचे आभार मानले. यावेळी संस्थेचे संस्थापक संतोष लुडबे, दादा वेंगुर्लेकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page