⚡वैभववाडी ता.२७-: वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने तालुकास्तरीय सहकार मेळावा शनिवारी दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये संपन्न होणार आहे. त्याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती खरेदी-विक्री संघाचे चेअरमन प्रमोद रावराणे यांनी दिली.
तालुकास्तरीय सहकार मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या मेळाव्याला जिल्हा उपनिबंधक श्री परब, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा संघाचे अध्यक्ष व्हिक्टर डान्टस, जिल्हा बँकेचे संचालक दिलीप रावराणे, कृषी विकास अधिकारी दिशांत कोळप, प्रभाकर सावंत, तुळशीदास रावराणे आदी उपस्थित राहणार आहेत.
सहकार मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी सर्व संचालकांनी प्रत्येक गावातील सोसायटी व ग्रामपंचायतीला भेट देऊन सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांना आमंत्रण दिले आहे. त्यामुळे हा सहकार मेळावा भव्यदिव्य होईल असा विश्वास प्रमोद रावराणे यांनी व्यक्त केला आहे. तर यावेळी शेती व पशुपालन तसेच शेतात नवीन प्रयोग करून आर्थिक प्रगती करणाऱ्या सहा शेतकऱ्यांचा गौरव पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या मेळाव्याला तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन प्रमोद रावराणे यांनी केले आहे.
