सिंधुदुर्गनगरी येथील प्रकार:खड्ड्यांमुळे गेला जीव..
ओरोस ता २३
सिंधुदुर्गनगरी येथील डॉन बॉस्को समोरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान बाईक आदळली व मागे बसलेल्या हेमलता धोंडू कुडाळकर या फेकल्या गेल्या. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या कुडाळ येथील रहिवासी व सिंधुदुर्गनगरी येथील सहाय्यक लेखाधिकारी असून कुडाळ नगरपंचायत नगरसेवक विलास कुडाळकर यांच्या त्या ज्येष्ठ भगिनी होत्या.
अत्यंत साध्या, मनमिळावू स्वभाव यामुळे सिंधूदुर्गनगरी येथील शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये त्या सर्वांच्याच ओळखीच्या होत्या. जिल्हा परिषदेतील लेखा आणि कोषागार कार्यालयामध्ये त्या सहाय्यक लेखाधिकारी म्हणून सरकारी सेवेत होत्या. पतपेढी मधील कामासाठी त्या गेल्या होत्या. डॉन बॉस्को समोरील खड्ड्यात त्यांची बाईक आदळली व पाठीमागे बसलेल्या कुडाळकर रस्त्यावर फेकल्या गेल्या व डोक्यात गंभीर दुखापत होऊन त्यांना आपला प्राण गमवावा लागला.
या अपघाताची व त्यानंतर लगेचच तिच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूची बातमी समजतात सिंधुदुर्गनगरीतील अधिकारी व कर्मचारी वर्गात व कुटुंबीयांत शोकाकुल वातावरण झाले होते. सिंधुदुर्गनगरी परिसरात रस्त्यांत खड्ड्यांनी चाळण केली आहे. त्यामुळे वाहन चालक सध्या जीव मुठीत घेवून वाहने चालवीत आहेत.
फोटो:- हेमलता कुडाळकर
