*💫सावंतवाडी दि.३०-:* “जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले” ह्या उक्तीनुसार समाजातील पिडीत, वंचित घटकांसाठी आपले जीवन समर्पित करावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करावा, सामाजिक बांधिलकी जोपासून सचेतन क्रांती घडविण्यासाठी सज्ज रहा, असे प्रतिपादन आंबेडकरी व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी विर्नोडा (गोवा) येथे आयोजित व्याख्यानात केले. विर्नोडा- पेडणे (गोवा) येथील संविधान संघ, गोवा यांच्यावतीने संविधान दिनानिमित्त ‘पे बॕक टू सोसायटी’ या विषयावर प्रा. रुपेश पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी गोवा विश्वभूषण समितीचे अध्यक्ष हरिश्चंद्र जाधव, रिपब्लिकन पार्टी (आठवले गट) गोवाचे अध्यक्ष सतीश कोरगावकर, संविधान संघ गोवाचे अध्यक्ष नामदेव धारगळकर आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. पाटील म्हणाले, बाबासाहेब म्हणजे विकारांच्या दऱ्या।बुजवून विचारांचे वटवृक्ष निर्माण करणारे युगपुरुष होते.आपल्या कमाईतून वीस टक्के हिस्सा समाजासाठी खर्च करावा, ही बाबासाहेबांची शिकवण आम्ही जोपासायला हवी, प्रत्येकाने आपल्या हातून विधायक सामाजिक कार्य घडेल याप्रमाणे आयुष्य जगायला हवे, बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी समाजातील उपेक्षित घटकांना साथ द्यायला हवी असे सांगून।डॉ. बाबासाहेबांच्या खडतर जीवनप्रवासाचा उलगडा केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव धारगळकर तर सूत्रसंचलन व आभार अमर फरास यांनी केले .
“सामाजिक बांधिलकी जोपासून सचेतन क्रांती घडविण्यासाठी सज्ज रहा : प्रा.रुपेश पाटील
