⚡मालवण ता.१९-:
समाजातील युवक युवतींनी कायद्याचे भान ठेवून आपले कर्तव्य आणि वर्तन ठेवले पाहिजे, न्यायप्रविष्ट प्रक्रिया समजून घेतली पाहिजे, या उद्देशाने मालवण येथील रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. उज्वला सामंत यांनी विद्यार्थ्यांना विविध कायदे विशेषता पोक्सो कायदा २०१२ या कायद्याविषयी मार्गदर्शन केले.
प्रारंभी प्रा. अन्वेषा कदम यांनी प्रास्ताविक करत पाहुण्यांचे स्वागत केले. पोक्सो कायदा लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करतो. हा कायदा १८ वर्षाखालील मुला मुलींना, बालकांना लैंगिक शोषण छळ, गैरवर्तनापासून वाचवण्यासाठी आहे. आणि अशा गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षा देतो. या कायद्यांतर्गत गुन्ह्यांची नोंद करणे बंधनकारक आहे आणि त्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्यात आली आहेत. पीडित बालकांना अनेक प्रकारच्या सेवा व आधार पुरवण्याची तरतूद या कायद्यात आहे. पोक्सो कायद्यातील शिक्षा गुन्ह्यांच्या तीव्रतेवर अवलंबून असते, ज्यात बाललैंगिक अत्याचार आणि छळ समाविष्ट आहे, असे यावेळी डॉ. उज्वला सामंत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
या कार्यक्रमासाठी बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. धामापूरकर, हेमांगी चव्हाण, मयुरी खोरजे, हर्षिता गावकर, जागृती परकर यांनी सहाय्य केले. सूत्रसंचालन प्रा. स्नेहा बर्वे यांनी केले व आभार प्रा. मिलन सामंत यांनी मानले.
