कणकवली : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशतर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवडा अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी नाटळ विभागाची नियोजन कार्यशाळा गुरुवार, १८ सप्टेंबर रोजी कनेडी बाजारपेठ, सांगवे येथील विभागीय कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली.
या कार्यशाळेला भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष संजना संदेश सावंत आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यशाळेत विभागस्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची रूपरेषा निश्चित करण्यात आली. यामध्ये रक्तदान शिबिर, बूथ स्तरावरील स्वच्छता अभियान, ‘एक पेड़ माँ के नाम’ या संकल्पनेअंतर्गत वृक्षारोपण तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आणि ‘मन की बात’ यांचा समावेश आहे.
नाटळ विभागातील सरपंच, उपसरपंच आणि भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने या कार्यशाळेला उपस्थित होते. आगामी काळात हे सर्व उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
