विशाल परब यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली केलय सेवाभावी उपक्रमाचे आयोजन..
⚡सावंतवाडी ता.१९-:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त साजरा होत असलेल्या ‘सेवा-सुशासन पंधरवड्या’ अंतर्गत, भारतीय जनता पार्टी सावंतवाडी शहर मंडळाच्या वतीने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून शहरातील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात होणार असल्याची माहिती सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष श्री. सुधीर आडिवरेकर यांनी दिली.
भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या सेवाभावी उपक्रमाचे आयोजन केले आहे. या शिबिराचा मुख्य उद्देश सावंतवाडी शहरातील नागरिकांना मोफत आणि तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा आहे.
या आरोग्य शिबिरात आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या फिरत्या दवाखान्याद्वारे १०० पेक्षा अधिक प्रकारच्या आरोग्य तपासण्या केल्या जाणार आहेत. यामध्ये संपूर्ण शरीर तपासणी, हिमोग्लोबिन, कोलेस्टेरॉल, रक्तातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब, हृदय तपासणी (ECG), युरिन टेस्ट आणि ऑक्सिजन पातळी यांसारख्या महत्त्वाच्या तपासण्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, तपासणीनंतर अवघ्या पाच ते दहा मिनिटांत रुग्णांना रिपोर्ट मिळणार आहेत.
या मोफत आरोग्य सेवेचा शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. सुधीर आडिवरेकर यांनी केले आहे.
