सौ. नमिता गांवकर यांच्यासह जिल्ह्यातील कलाकारांच्या चित्रपटात भूमिका..
⚡मालवण ता.१८-:
अलीकडच्या काळात खेडेगावात राहणाऱ्या मुलांची लग्न न होणे ही मोठी समस्या बनली आहे. मुलीला मुंबई सारख्या महानगरीत फ्लॅट मध्ये राहणारा, नोकरी करणारा मुलगा हवा असतो, हाच कथासूत्राचा धागा पकडून विजय कलमकर यांनी दिग्दर्शीत केलेला कुर्ला टू वेंगुर्ला हा चित्रपट १९ सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. मराठी सिनेजगतातील मोठी स्टारकास्ट या चित्रपटात आहेच. परंतु, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हौशी आणि व्यावसायिक रंगभूमीवर काम करणारी आमच्या सारख्या मंडळींनीही या चित्रपटात छोट्या मोठ्या भूमिका केल्याने मालवणी मुलुखातील जनतेने हा चित्रपट जरूर पहावा, कारण कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटाला इथल्या मातीचा गंध आहे, असे भावोद्गार सिंधुदुर्गातील हौशी आणि व्यावसायिक रंगभूमीवरील सिने नाट्य अभिनेत्री सौ. नमिता गांवकर यांनी येथे बोलताना काढले.
कुर्ला टू वेंगुर्ला हा काहीसा विनोदी ढंगाचा चित्रपट उद्या १९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात ग्रामीण भागातील तरुणांच्या मानसिकतेचा वेध घेत एका विवाहाची रंजक कथा मांडली गेली आहे. या चित्रपटात प्रल्हाद कुडतरकर, वीणा जामकर, वैभव मांगले, सुनील तावडे, स्वानंदी टिकेकर, साइंकीत कामत अशी स्टारकास्ट आहे. तसेच सिंधुदुर्गातील हौशी व व्यावसायिक रंगभूमीवर काम केलेल्या कलावंतांचा यात भरणा आहे. यामध्ये विजय गांवकर, नंदू पाटील, निर्मला टिकम, नमिता गांवकर आणि इतर कलाकारांचा समावेश आहे.
कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटात तारकर्ली गावच्या नमिता गांवकर आणि निर्मला टिकम या बहिणींनी काम केले असून या दोघी बहिणी गुणी कलावंत म्हणून ओळखल्या जातात. या चित्रपटात नमिता गांवकर यांनी जमीनदाराच्या पत्नीची भूमिका केली असून विनोदी ढंगाची भूमिका असल्याने ती लोकांच्या पसंतीस उतरेल असा आशावाद नमिता गांवकर यांनी व्यक्त केला आहे.
नमिता टिकम या गेली तीस वर्षे नाट्य क्षेत्राशी तर पाच – सहा वर्षे सिने सृष्टीशी निगडित आहेत. कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटात मोठ्या स्टारकास्ट बरोबर काम करायला मिळाल्याने नमिता गांवकर या खुश असून सिंधुदुर्गातील कलाकारांना सामावून घेणारा हा चित्रपट असल्याने व या चित्रपटात मालवणी मुलुखातील कथा गुंफलेली असल्याने चित्रपट रसिकांनी हा चित्रपट पहावा, असे नमिता गांवकर यांनी म्हटले आहे.
