मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा १७ सप्टेंबरला शुभारंभ…

प्रफुल्ल वालावलकर:ओरोस येथे ११ सप्टेंबरला जिल्हास्तरीय तर कुडाळमध्ये १२ सप्टेंबरला कार्यशाळा..

कुडाळ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ येत्या १७ सप्टेंबर पासून होत आहे. स्पर्धात्मक स्वरूप असलेल्या या अभियानाबाबतची जिल्हास्तरीय कार्यशाळा ११ सप्टेंबरला ओरोस येथे तर तालुकास्तरीय कार्यशाळा १२ सप्टेंबरला सकाळी १० वाजता महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे होणार आहे. अशी माहिती कुडाळचे गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी दिली. कुडाळ पंचायत समितीमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कुडाळ पं.स. येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कक्ष अधिक्षक मृणाल कार्लेकर, विस्तार अधिकारी संजय ओरोसकर व सुनिल प्रभू आदी उपस्थित होते.
बीडीओ प्रफुल्ल वालावलकर म्हणाले, पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून गावांचा विकास करण्यासाठी राज्य शासनाकडून हे नाविन्यपूर्ण अभियान राज्याभरात राबविण्यात येणार आहे. याचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा दिवशी येत्या १७ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. त्यानंतर ३१ डिसेंबर पर्यंत शाश्वत विकासाची ध्येय घेऊन हे अभियान राबविण्यात येणार आहे. १७ ध्येय आणि १६९ उद्दिष्टांवर हे अभियान राबविण्यात येणार असून, ग्राम स्तरावर स्पर्धात्मक स्वरूपात हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा गुरूवारी ११ सप्टेंबर रोजी ओरोस येथे होणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यशाळेला खासदार, मंत्री, आमदार तसेच जिल्हास्तरीय सर्व अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेत जिल्ह्यातील सर्व सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी तसेच जिल्हास्तरीय अधिका-यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कुडाळ तालुक्यातही हे अभियान राबविण्यात येणार असून शुक्रवारी १२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. कुडाळ येथील महालक्ष्मी हाॅल येथे कुडाळ तालुकास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यशाळेला जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्यासह जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेत तालुक्यातील सर्व उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, ग्रामरोजगार सेवक, तालुकास्तरीय खातेप्रमुख, अधिकारी यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे, असे श्री.वालावलकर यांनी सांगितले. आतापर्यंत राबविण्यात आलेल्या विविध अभियानांच्या पारितोषिकांपेक्षा जास्त रक्कमेची बक्षिसे हे या अभियानाचे वैशिष्ट्य आहे. या अभियानात यशस्वी होणाऱ्या ग्रा.पं. ना तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
या अभियानांतर्गत तालुकास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक ग्रा.पं. ना अनुक्रमे १५ लाख रू., १२ लाख रू. व ८ लाख रू., जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाला अनुक्रमे ५० लाख रू., ३० लाख रू. व २० लाख रू., विभाग स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाला अनुक्रमे १ कोटी रू., ८० लाख रू., व ६० लाख रू. आणि राज्य स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाला अनुक्रमे ५ कोटी, ३ कोटी व २ कोटी रूपये अशी मोठी बक्षिसे यशस्वी ग्रामपंचायतींना देऊन गौरविण्यात येणार आहे.
ग्रा.पं. सक्षम करणे, विविध योजना तळागाळापर्यंत पोचवणे, गावात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे आदी अनेक मुद्द्यांवर प्रत्येक ग्रा.पं. चे तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय अशा चार टप्प्यात शंभर मार्कांचे गुणांकन करुन ही बक्षिसे दिली जाणार आहेत, असे श्री.वालावलकर यांनी सांगून ग्रामीण विकासात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या अभियानात तालुक्यातील जनता, स्वयंसेवी संस्था, युवक मंडळे, सामाजिक संस्था या सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

You cannot copy content of this page