⚡कणकवली ता.१०-: एलसीबी सिंधुदुर्गच्या पथकातील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके यांच्यासह कणकवली पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनोद सुपल, पोलीस हवालदार पांडूरंग पांढरे यांच्या तडकाफडकी बदलीचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी मंगळवारी दिले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेशण शाखा सिंधुदुर्गमध्ये कार्यरत असलेले श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रामचद्र शेळके यांची पोलीस नियंत्रण कक्ष सिंधुदुर्ग येथे तर कणकवली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कणकवली शहर बीट अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनोद सुपल यांची व कणकवली पोलीस ठाणे येथे ठाणे प्रभारी अधिकारी यांच्या लेखनिक पदी कार्यरत असलेले हवालदार पांडूंरंग पांढरे या दोघांची कणकवली पोलीस ठाण्यातून उचलबांगडी करुन त्यांची पोलीस मुख्यालयात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली शहरातील घेवारी याच्या मटका अड्ड्यांवर टाकलेल्या धाडीनंतर सिंधुदुर्गात मोठी खळबळ उडाली होती. खुद्द पालकमंत्र्यांनीच कणकवली शहरातील भर बाजारपेठेत मटका बुकी अड्ड्यांवरील धाडीमुळे सिंधुदुर्ग पोलीसांच्या निष्क्रीयतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली होती. त्यानंतर कणकवली पोलीस निरीक्षकपदी कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचे तात्काळ निलंबन करण्यात आले होते. तर या प्रकरणाची सखोल चौकशी करुन यासंदर्भाचा अहवाल देण्याचा आदेश पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांना दिला होता. याबाबतचा सविस्तर अहवाल अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी २७ ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षकांना सादर केला होता. अप्पर पोलीस अधीक्षक साटम यांनी सादर केलेल्या अहवालाच्या संदर्भानुसार पीएसआय शेळके, एएसआय सुपल, हवालदार पांढरे यांची बदली करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी दिली.