११ रोजी आयोजन:पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन:सी ई ओ खेबुडकर यांची माहिती..
ओरोस ता ९
मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानाची पहिली कार्यशाळा ११ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्गनगरी येथील इच्छापूर्ती मंगल कार्यालय येथे सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते होणार असून जिल्ह्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक आणि समाजसेवी संस्था प्रतिनिधी यांना यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. किमान एक हजार व्यक्ती या प्रशिक्षणाला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानाचे आयोजन केले आहे. हे स्पर्धात्मक अभियान सिंधुदुर्ग जिल्ह्यात यशस्वीपणे तसेच विशेष प्रयत्न करून राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने तयारी सुरू केली असून ११ रोजी पाहिले प्रशिक्षण राबविण्यात येत आहे. त्याची माहिती देण्यासाठी खेबुडकर यांनी मंगळवारी दुपारी ३ वाजता आपल्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना खेबुडकर यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानाचा शुभारंभ होत आहे. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे. शासनाच्या प्रत्येक योजना ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचविणे. त्यातून सर्व गाव समृध्द करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. लोकसहभाग आणि श्रमदान या माध्यमातून हे अभियान राबवायचे आहे, असे सांगत खेबुडकर यांनी यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायतीनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
लोकाभिमुख आणि गतिमान प्रशासन करतानाच नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करणे. ऑनलाईन सेवा सुखर करणे. सर्व शासकीय संस्था सी सी टी व्ही च्या निगराणी खाली आणणे आदी कामांना यावेळी प्राधान्य दिले जाणार आहे. शासकीय दप्तर अद्यावत करणे, दिव्यांग व्यक्तींना ओळखपत्र वितरीत करणे. प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याचा ताळेबंद करणे. १०० टक्के कर पट्टी वसुली करणे. तसेच सर्व ग्राम पंचायतीची स्वतंत्र वेबसाईट तयार केली जाणार आहे. शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. मात्र, ही कामे करताना लोकवर्गणीतून केली जाणार आहेत, असे यावेळी खेबुडकर यांनी सांगितले.
यासाठी ग्राम पंचायतींना तालुका स्तरापासून राज्य स्तरापर्यंत १५ लाख ते ५ कोटी रुपये एवढ्या रक्कमेचे पुरस्कार दिले जाणार आहेत. तसेच पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद यांना विभाग स्तरावर आणि राज्य स्तरावर अशाप्रकारे मोठ्या रक्कमेचे पुरस्कार ठेवण्यात आले आहेत. या अभियानाची पहिली ग्रामसभा ११ ते १६ सप्टेंबर या कालावधीत तर दुसरी ग्रामसभा १७ सप्टेंबर रोजी होणार आहे, असे शेवटी खेबुडकर यांनी सांगितले.
फोटो ओळ:- सिंधुदुर्गनगरी: पत्रकार परिषदेत बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर सोबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब