⚡बांदा ता.०४-:
इन्सुली खामदेव नाका ते बांदा पत्रादेवी बॉर्डर या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे आणि उड्डाणपूलावर बंद असलेले पथदीप यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज आंदोलन केले. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या सहाय्यक कार्यकारी अभियंता वृषाली पाटील यांनी दोन दिवसांत खड्डे बुजविण्याचे आणि आठ दिवसांत पथदीप सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सत्ताधारी व विरोधी सदस्यांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली.
मुंबई – गोवा महामार्गावर आरटीओ चेकनाका ते पत्रादेवी दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. ज्यामुळे प्रवासी आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणी येत आहेत. तसेच उड्डाणपुलावरील पथदीप बंद असल्याने रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका वाढला आहे. या समस्यांकडे संबंधित विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाचा दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी सटमटवाडी येथे सर्वपक्षीय आंदोलन छेडले.
आज सकाळी ग्रामस्थांनी एकत्र येत आंदोलन सुरू केले. या आंदोलनात ग्रामपंचायत प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. ग्रामपंचायत प्रशासन पाठपुरावा करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्य व आंदोलक यांच्यात यावरून जोरदार वाद झाला.
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या सहाय्यक कार्यकारी अभियंता वृषाली पाटील यांनी घटनास्थळी आंदोलकांशी चर्चा केली. आंदोलकांच्या प्रश्नांना त्या समर्पक उत्तरे देऊ शकल्या नाहीत. अखेर दोन दिवसांत सर्व खड्डे भरले जातील आणि आठ दिवसांत उड्डाणपूलावरील पथदीप सुरू केले जातील. त्यासाठी सर्व प्रशासकीय बाबी पूर्ण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी त्यांचे आंदोलन तूर्तास स्थगित केले. विहित मुदतीत काम पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला.
यावेळी वेळी सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर, शामसुंदर धुरी, बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच आबा धारगळकर, माजी उपसरपंच बाळू सावंत, जावेद खतीब, सदस्य रत्नाकर आगलावे, साईप्रसाद काणेकर, मनसे तालुकाध्यक्ष मिलींद सावंत, सुशांत पांगम, प्रशांत पांगम, बाळा आकेरकर, बाबा काणेकर, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, अजय महाजन, भैय्या गोवेकर, निखील मयेकर, अशोक परब, गुरु कल्याणकर, निलेश पटेकर, आसिफ शेख, गणेश बांदेकर आदींसह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
