⚡मालवण ता.२६-:
नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाने आयोजित केलेल्या ‘नारळ लढविणे’ रिल्स स्पर्धेचा निकाल येथील शासकीय विश्रामगृहात जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत सिद्धेश अर्जुन चव्हाण याने प्रथम क्रमांक मिळवला. गौरेश शरद कांबळी याने द्वितीय तर ऋग्वेद केरकर याने तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्यांना रोख रक्कम, आकर्षक चषक आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
या स्पर्धेत सर्वेश पेडणेकर, रोहन सावंत, अमोल सावंत, चेतन खोत, ओम तोडणकर, आणि तन्मय नाईक यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी तहसीलदार वर्षा झालटे यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाचे उपक्रम समाजाभिमुख असून ‘नारळ लढविणे’ स्पर्धेच्या माध्यमातून महिलांनाही उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेला उत्साह आणि ऊर्जा पाहून त्यांनी कौतुक केले. यावर्षी तरुण आणि युवक स्पर्धकांनी बाजी मारली असली तरी भविष्यात महिला आणि तरुणींनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने भाग घेऊन विजयी व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आज महिला सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत, असेही त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत, शिल्पा खोत, यतीन खोत, लेफ्टनंट प्रा. डॉ. मल्लेश खोत, दर्शन वेंगुर्लेकर, दत्ता पिंगुळकर, मंदार सरजोशी, मिताली कोरगावकर, श्रीकांत मालवणकर, अमन गोडावले, पत्रकार प्रशांत हिंदळेकर, अमित खोत, कृष्णा ढोलम, भूषण मेतर आदी उपस्थित होते.
याशिवाय स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सेवेते संस्था, वाईल्ड लाईफ रेस्क्यू संघटना आणि स्वराज्य ढोल ताशा पथकाचे सदस्यही मोठ्या संख्येने उपस्थित होते.