वेंगुर्ला प्रतिनिधी-: गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला बाजारात बहुसंख्य गणेशभक्तांनी माटवीच्या सामानाची खरेदी केली. अधूनमधून पावसाचे विघ्न असले तरी बाजारपेठेत गणेशभक्तांची गर्दी दिसून आली.
बुधवारपासून सर्वत्र गणेश चतुर्थीचा सण सुरु होत आहे. त्यानिमित्त वेंगुर्ला बाजारात रविवारीपासूनच माटवीचे सामान तसेच पूजा आणि सजावटीचे साहित्य दाखल झाले होते. सोमवारी सायंकाळीपासून ख-या अर्थाने माटवीच्या बाजाराला सुरूवात झाली. पंचक्रोशीतील किरकळ विक्रेत्यांनी विविध साहित्यांनी बाजार मांडला होता. बरेच गणेशभक्त माटवीचे सामान हे प्रामुख्याने चतुर्थीच्या आदल्यादिवशी खरेदी करतात. त्यामुळे आज मंगळवारी हा माटवीचा बाजार भरला. परंतु, सकाळपासूनच पावसाने हजेरी लावल्याने सकाळी दहावाजेपर्यंत तरी किरकोळ स्वरूपात गणेशभक्तांची रिमझिम पावसातच खरेदी सुरू होती. त्यानंतर पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे ब-याच गणेशभक्तांनी बाजारपेठेत दाखल होत विविध सामानांची खरेदी केली. माटवीच्या सामानासोबतच पूजा साहित्य, फळे, फुले, फटाके आदी दुकानांमध्ये भाविकांची गर्दी दिसून आली. साधारण ५० रूपयांपासून ते एक हजार रूपयांपर्यंत फुलांचे हार तसेच मोदक, करंज्या, लाह्या आदी वस्तूही बाजारपेठेत विक्रीस आल्यास आहेत.
फोटोओळी – गणेशभक्तांनी वेंगुर्ला बाजारपेठेत माटवीच्या सामानाची खरेदी केली.
वेंगुर्ल्यात गणेशभक्तांकडून माटवीच्या सामानाची खरेदी…
