४२ स्टॉल्समधून ९० विद्यार्थी सहभागी..
कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालयात शनिवारी बीएमएस आणि बीएएफ विभागातर्फे ‘स्टुडन्टस बाजार’ या उपक्रमाचे उत्साहात व यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. या अनोख्या अशा ऊपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. विविध वस्तूंचे ४२ स्टॉल्स मांडण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे क.म.शि.प्र. मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे मॅडम यांनी बहुमोल असे मार्गदर्शन केले व कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर उद्योजक गजानन कांदळगावकर यांनीही विद्यार्थ्यांना उद्योजकतेबाबत संबोधित केले. स्टुडन्टस बाजारातील स्टॉल्सना क.म.शि.प्र. मंडळाचे पदाधिकारी अनंत वैद्य व का. आ. सामंत यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.
या उपक्रमांतर्गत एकूण ४२ स्टॉल्स उभारण्यात आले होते, ज्यामध्ये ९० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्टॉल्समध्ये गणपती पूजेचे साहित्य, सजावट साहित्य, कपडे, खाद्यपदार्थ व पेये, भेटवस्तू, हस्तकला वस्तू, सौंदर्यप्रसाधने आणि इतर विविध उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. या उपक्रमाचा लाभ ४०० हून अधिक विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी घेतला. विद्यार्थ्यांनी ग्राहकांशी थेट संवाद साधून विक्री कौशल्ये, वेळेचे नियोजन, स्टॉक मॅनेजमेंट आणि संघभावना यासारख्या व्यावसायिक बाबी प्रत्यक्ष अनुभवातून आत्मसात केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी कुमार अवधुत आचरेकर तर आभार प्रदर्शन कुमारी साक्षी फर्नांडिस हिने केले. महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बी. एम. एस. विभाग प्रमुख प्रा. दयानंद ठाकूर तसेच प्रा. सोमदत्त चव्हाण, प्रा. सोनाली आंगचेकर, प्रा. सबा शहा, प्रा. प्रणव तेंडोलकर, प्रा. गीताश्री ठाकूर, प्रा. रघुनाथ सावंत, प्रा. सुवर्णा निकम व प्रा. जकीरा राजगुरु या सर्वांचे विशेष सहकार्य लाभले.