गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय टाळा;पालकमंत्री नितेश राणे..
⚡सिंधुदुर्गनगरी ता.२१-: सततच्या पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे रस्त्यांची डागडूजी व दुरूस्तीची कामे 25 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करा. पावसाळ्याचे दिवसांत साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या अधक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा बॅकेचे अध्यक्ष मनीष दळवी, पी.एम. विश्वकर्मा समितीचे सदस्य प्रभाकर सावंत, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री राणे पुढे म्हणाले की, गणेशोत्सवासाठी अनेक ठिकाणांहून चाकरमानी जिल्ह्यात येत असतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आपले कर्तव्य असल्याने जिल्ह्याच्या प्रवेशाच्या ठिकाणी, रेल्वे स्थानकांवर आरोग्य पथकांची नेमणूक करा. पावसाळा लक्षात घेता साथीचे आजार निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्या. औषधसाठा कमी पडणार नाही याची काळजी घ्या. जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे ही गंभीर समस्या बनली आहे. राष्ट्रीय महामार्गाची अवस्था बिकट झाली आहे. यासह राज्य महामार्ग, जिल्हा परीषद अखत्यारीतील रस्त्यांची डागडूजी आणि दुरूस्तीची कामे 25 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करा. दुरूस्तीचे काम करत असताना प्राधान्य क्रम ठरवून कामे पूर्ण करा असेही ते म्हणाले.