जनतेने सहभागी होण्याचे मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे आणि सचिव राजेश टंगसाळी यांचे आवाहन
*💫कुडाळ दि.३०-:* राज्यकर्त्यांच्या बेजबाबदार कारभारविरोधात जनतेमध्ये तीव्र असंतोष आहे. हा असंतोष व जनभावना जिल्हा प्रशासन स्तरावर मांडण्यासाठी मनसेने ३ डिसेंबर रोजी लक्षवेधी जन आंदोलन पुकारले आहे. जनतेनेही या आंदोलनात उत्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे व सचिव राजेश टंगसाळी यांनी केले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ सुधारणा व रुंदीकरण उपक्रम जिल्ह्यात सुरू झाल्यापासून महामार्ग विभाग व जिल्हा प्रशासनाकडून आजपर्यंत प्रकल्पग्रस्तांवर व स्थानिक जनतेच्या न्याय्य मागण्यांसंदर्भात नेहमीच डोळेझाक करण्यात आलेली आहे. त्यामुळे भ्रष्ट व निर्ढावलेल्या महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या मनमानी व नियोजनशून्य कारभाराचा रेटा चालूच ठेवून सर्व सामान्य जनतेच्या हक्काच्या मागण्या दडपून टाकल्या आहेत. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक निवेदने व आंदोलने करून देखील प्रशासनाकडून त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष चालू आहे या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी ११ फेब्रुवारी 2020 रोजी घेतलेल्या संयुक्त बैठकीत प्रकल्पग्रस्त व स्थानिक जनतेच्या मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देऊनही आजपर्यंत फक्त वेळ मारून नेण्याचेच काम महामार्ग प्राधिकरण व कंत्राटदार व्यवस्थापनाने केल्याचा आरोप मनसेने दिलेल्या निवेदनात केला आहे.त्या अनुषंगाने येत्या गुरुवार दि ३ डिसेंबर रोजी पणदूर तिठा ब्रिज खाली वेताळ बांबर्डे, पणदूर, ओरोस अशा गर्दीच्या व ठिकाणी पूर्वीप्रमाणे दुतर्फा प्रवासी पिकप शेडची बांधणी करणे, हायवेपासून लगतच्या गावांना जोडणाऱ्या जोड रस्त्यांची तात्काळ सुधारणा करणे, महामार्ग भूसंपादन क्षेत्रात आलेल्या वेताळ बाँबर्डे तेलीवाडी येथील नळपाणी योजनेच्या विहिरीचा प्रश्न निकाली काढणे, प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचा प्रलंबित भूसंपादन मोबदला तात्काळ अदा करणे, पणदूरतिठा मयेकर वाडी येथील हायवेचे पारंपारिक पाण्याचे प्रवाह महामार्गामुळे बंद झाल्याने होणाऱ्या भातशेती नुकसानीस घालून व परिसरातील घरांच्या संरक्षक बाबींची उपाययोजना करणे, वेताळ-बांबर्डे हातेरी नदी पुलानाजीक पणदूर व बाँबर्डे ग्रामस्थांसाठी गणेश विसर्जन घाट बांधणी करणे आदी मागण्यांसाठी मनसेने आंदोलन पुकारले आहे. आजपर्यंत महामार्ग विषयक झालेल्या आढावा बैठकांमध्ये पालकमंत्र्यांनी यासंबंधीची वारंवार तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देऊनही प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याने राज्यकर्त्यांच्या बेजबाबदार कारभारविरोधात जनतेमध्ये तीव्र असंतोष आहे. हा असंतोष व जनभावना जिल्हा प्रशासन स्तरावर मांडण्यासाठी मनसेने लक्षवेधी जन आंदोलन पुकारले असून जनतेनेही ह्यात उत्फुर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे व सचिव राजेश टंगसाळी यांनी केले आहे.