भाजप महिला मोर्चा तर्फे आयोजन:अभिनेत्री श्रद्धा खानोलकर यांच्या हस्ते उदघाटन..
⚡कुडाळ ता.०७-: भारतीय जनता पार्टी, महिला मोर्चा कुडाळ यांच्या माध्यमातून ‘चला खेळूया मंगळागौर’ हा खास श्रावणातील पारंपरिक खेळ, फुगडी, उखाणे आणि हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सोमवार दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३ वाजल्यापासून महालक्ष्मी हॉल, कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला सर्व महिलांनी उपस्थित राहून मंगळागौर खेळाचा आनंद घ्यावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, कुडाळ मंडल अध्यक्ष सौ.आरती पाटील यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन आपल्याच जिल्ह्यातील उत्कृष्ट अभिनेत्री सौ. श्रद्धा खानोलकर यांच्या शुभहस्ते आणि भाजपा महिला जिल्हाध्यक्षा सौ.श्वेता कोरगावकर, भाजपा राज्य परिषद सदस्य सौ.संध्या तेरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने नेहमीच विविध माध्यमांतून -उपक्रमांमधून आपली संस्कृती जपण्याचा , संवर्धन करण्याचा प्रयत्न असतो. खास करुन महिला मोर्चाच्या माध्यमातून रक्षाबंधन, कन्यापुजन, हळदीकुंकू, फुगडी, रांगोळी स्पर्धा असे विविध उपक्रम घेण्यात येतात. या उपक्रमांतून समाजातील सर्व स्तरातील महिला भगिनींना सोबत घेऊन येणाऱ्या नवीन पिढीमध्ये आपल्या संस्कृतीची ओढ निर्माण करणे, अनेक ठिकाणी लुप्त जाणारे आपले पारंपरिक खेळ यांचे पुनरुज्जीवन करण्याचा, सर्वांना सोबत घेऊन एक चांगला प्रयत्न आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सातत्याने करत आहोत.
श्रावण महिना हा खरं तर लेकी-सुनांचा, माहेरवाशीणींचा आवडता महिना. याच महिन्यात आपल्या सख्यांसोबत झिम्मा फुगडी खेळत पुन्हा पुन्हा भरभरून उरात आनंद साठवुन घेतला जातो. निसर्गाच्या हिरवाई सोबत संपुर्ण आसमंतात इंद्रधनुचा मनमोहक खेळ सुरु असतो . हे सर्व जगण्याला अर्थ प्राप्त करुन देणारे आनंदाचे क्षण आज हरवत चालले आहेत. त्यांना हरवू न देता त्याचा पुन्हा नव्याने आनंद लुटावा याच साठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या महिलांनी हा खास श्रावणातील ‘चला खेळूया मंगळागौर’ कार्यक्रम आयोजित केला आहे. जास्तीत जास्त महिलांनी हा कार्यक्रम नुसता पाहायला नाही तर झिम्मा – फुगडी खेळायला आपल्या लेकी- सुना आणि मैत्रिणींना घेऊन आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, कुडाळ मंडल अध्यक्ष सौ.आरती पाटील यांनी केले आहे.