जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी करावा डाऊनलोड:मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांचे आवाहन..
ओरोस ता ५
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) आणि जल जीवन मिशन यांसारख्या केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमांमुळे ग्रामीण भागात स्वच्छता व पिण्याच्या पाण्याचा दर्जा उंचावण्यासाठी अनेक पावले उचलली जात आहेत. या पार्श्वभूमीवर सरपंचांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास अधिक गतिमान व परिणामकारक करण्यासाठी “सरपंच संवाद” हे मोबाईल ॲप लाँच करण्यात आले असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी जिल्ह्यातील सर्व सरपंचांना केले आहे.
२२ एप्रिल २०२५ रोजी जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या हस्ते केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत “स्वच्छ व सुजल ग्रामसाठी नेतृत्व” या कार्यक्रमात ‘सरपंच संवाद’ मोबाईल ॲपचे लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमामध्ये क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) या संस्थेच्या सहकार्याने हे ॲप विकसित करण्यात आले असून, याचा उद्देश ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता, संवाद आणि नविन उपक्रमांची देवाणघेवाण वाढविणे हा आहे.
या ॲपच्या माध्यमातून सरपंच आपल्या गावातील उत्तम कामकाज शेअर करू शकतात, देशभरातील इतर गावांतील यशोगाथा पाहू शकतात, विविध विषयांवरील प्रशिक्षण घेऊ शकतात, बातम्यांची माहिती मिळवू शकतात व ऑनलाईन प्रमाणपत्र मिळवू शकतात. हे ॲप स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) आणि जल जीवन मिशन या दोन्ही अभियानांच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यास मदत करणारे प्रभावी डिजिटल साधन आहे अशी माहिती रविंद्र खेबुडकर यांनी दिली.
चौकट
Android वापरकर्त्यांसाठी https://play.google.com/store/apps/details?id=com.qci.sarpanch_samvaad ही लिंक आहे. तर
iOS वापरकर्त्यांसाठी https://apps.apple.com/in/app/sarpanch-samvaad/id6452552802
box ही लिंक आहे. जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी हे ॲप तात्काळ डाऊनलोड करून त्याचा नियमित व योग्य वापर करावा, जेणेकरून गाव स्वच्छ, सुजल व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करू शकेल, असे आवाहन खेबुडकर यांनी केले आहे.
फोटो:- रवींद्र खेबुडकर