महाविकास आघाडीला निर्णय मान्य तर महायुतीला निर्णय अमान्य:पोलिसांच्या भूमिकेकडे कुडाळवासीयांचे लक्ष..
कुडाळ : कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी यावर्षी कुडाळ मधील नारळी पौर्णिमेनिमित्तिने होणाऱ्या रिक्षा मिरवणूक रॅलित दोन्ही गटाने माणसे कितीही आणा पण रॅलीत प्रत्येकी एकच रिक्षा आणा अशा सक्त सूचना महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिल्या. कुडाळ पोलीस निरीक्षकांचा हा निर्णय कायम राहील्यास गेल्या कित्येक वर्षाची नारळी पौर्णिमेनिमित्त कुडाळमध्ये होणारी रिक्षा रॅलीची प्रथा खंडित होण्याची शक्यता आहे. मात्र कुडाळ पोलिसांच्या या सूचनेला महायुती गटाने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे आता कुडाळ पोलीस निरीक्षक याबाबत कोणती भूमिका घेतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
नारळी पौर्णिमेनिमित्त प्रतिवर्षी कुडाळ शहरात दोन्ही गटाकडून भव्य अशी रिक्षा रॅली कुडाळ पोस्ट ऑफिस ते भगंसाळ नदीपत्रापर्यंत काढली जाते, दोन्ही गटाच्या रॅलीत मोठ्या प्रमाणात पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित असतात. गतवर्षी अशाच प्रकारे दोन्ही गटाकडून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालयासमोर फटाके वाजविण्याच्या कारणावरून दोन्ही गट आमने-सामने आल्यामुळे मोठा वाद झाला होता. त्या वादाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी यावर्षी नारळी पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या रिक्षा रॅलीला काही निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कुडाळ पोलीस ठाण्यात बैठक बोलावण्यात आली होती. याबाबतच्या सूचना महायुती व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व रिक्षा चालकांना या बैठकीत देण्यात आल्या.
कुडाळ पोलीस निरीक्षकांचा हा निर्णय आपल्याला मान्य असल्याचे महाविकास आघाडीचे ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी सांगितले. मात्र गेल्या कित्येक वर्षाची परंपरा असलेली रिक्षा रॅली आम्ही बंद करणार नाही, आम्ही शांततेत रिक्षा मिरवणूक रॅली काढू अशी विनंती महायुती गटाकडून शिंदे शिवसेना तालुकाप्रमुख विनायक राणे यांनी कुडाळ पोलीस निरीक्षकांना केली आहे. मात्र आम्ही एकच रिक्षा रॅलीत ठेवण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सांगितले. त्यामुळे कुडाळ मधील नारळी पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या रिक्षा रॅली मिरवणूकीत नेमकं काय होणार? रॅलीत एकच रिक्षा असणार की प्रतिवर्षीप्रमाणे असंख्य रिक्षा असणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
एका रिक्षेचा निर्णय मान्य नाही – विनायक राणे
नारळी पौर्णिमा हा आमच्या दृष्टीने महत्त्वाचा सण आहे. गेली कित्येक वर्ष या दिवशी आम्ही मोठ्या आनंदाने रिक्षा रॅली काढतो. रिक्षा व्यावसायिक पण रॅलीत उस्फूर्तपणे सहभागी होतात. अनेक नागरिकांचा सुद्धा मोठा सहभाग असतो. असे असताना कुडाळ पोलीस निरीक्षक एकच रिक्षा रॅलीत ठेवा. माणसे कितीही आणा असे सांगत आहेत, हे आम्हाला मान्य नाही. आम्ही पारंपरिक पद्धतीने रिक्षा रॅली काढणार त्याबाबतची विनंती आम्ही पोलिस निरीक्षकांना केली असल्याचे शिवसेना कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे यांनी सांगितले.
मिरवणूक रॅलीत एक रिक्षा असली तरी चालेल – राजन नाईक
नारळी पौर्णिमेनिमित्त कुडाळ ते भंगसाळ नदीपात्रापर्यंत रिक्षा रॅलीची मिरवणूक निघते. ही गेले कित्येक वर्षाची परंपरा आहे. या परंपरेत खंड पडता कामा नये मात्र मिरवणूक रॅलीत एक रिक्षा असली तरी आम्हाला कोणतीही अडचण नाही. आपण घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य आहे. कारण रॅलीत एक पेक्षा अधिक रिक्षा असल्या तर त्या रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल करू असे पोलीस सांगत आहेत. नाहक रिक्षाचालकांवर गुन्हे नको म्हणून आम्हाला मिरवणूकीत एक रिक्षा असली तरी चालेल, पण नारळी पौर्णिमेनिमित्त मिरवणूक रॅली ही झालीच पाहिजे, असे महाविकास आघाडी गटाकडून शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी सांगितले.