विनापरवाना बंदुका प्रकरणी पाच जणांना तीन दिवसांची पोलीस कोठडी…!

कुडाळ : विनापरवाना बंदुका बनवण्याचे साहित्य आपल्या ताब्यात बाळगल्याप्रकरणी कुडाळ तालुक्यातील मोरे-मधलीवाडी येथील शांताराम दत्ताराम पांचाळ आणि आप्पा उर्फ परेश कृष्णा धुरी (दोघेही रा. माणगांव) या दोघांना कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकरणी यशवंत राजाराम देसाई (आजरा-कोल्हापूर), प्रकाश राजाराम गुरव (आजरा) आणि सागर लक्ष्मण घाडी (नांदरुख-मालवण) यांनाही ताब्यात घेतले. या प्रकरणी न्यायालयीन कोठडी मिळालेल्या या पाचही जणांना कुडाळ पोलिसांनी पुन्हा अटक करून आज सायंकाळी उशिरा कुडाळ न्यायालयात हजर केले असता या पाचही जणांना ७ ऑगस्ट पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी कुडाळ न्यायालयाने सुनावली आहे.
कुडाळ पोलिसांच्या पथकाने शांताराम पांचाळ यांच्या घरी छापा टाकून ही कारवाई केली होती. या छाप्यामध्ये पोलिसांना गवारेड्याचे व हरिणाचे शिंग, बेकायदेशीर बंदुका आणि साहित्य पोलिसांनी जप्त केले होते. आणि माणगाव येथील दोघांना अटक केली होती. त्याच बरोबर विनापरवाना बंदुका बनविण्या प्रकरणी आजरा येथील दोन आणि नांदरुख मालवण येथील एक अशा आणखी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली होती. या तिघांकडून एकूण सहा बंदुका पोलिसांनी जप्त केल्या होत्या. यशवंत राजाराम देसाई (58 रा वाणी गल्ली आजरा) व प्रकाश राजाराम गुरव (४०, रा आजरा) तर सागर लक्ष्मण घाडी (38 रा नांदरुख मालवण) अशी या संशयीतांची नावं आहेत. या तिघांनी बेकायदा बंदुका विकत घेतल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.
दरम्यान कुडाळ पोलिसांनी शनिवारी विनापरवाना बंदूक बनवण्याचे साहित्य बाळगल्या प्रकरणी अटक केलेले संशयित शांताराम दत्ताराम पांचाळ (41 राह मोरे मधली वाडी) व आप्पा उर्फ परेश कृष्णा धुरी (32 रा माणगाव) या दोघांसह एकूण पाच जणांना कुडाळ न्यायालयात हजर केलं होते. त्यावेळी न्यायालयाने या पाचही जणांना न्यायालयीन कोठडी दिली होती. या पाचही जणांना जामीन सुद्धा झाला होता. पण त्याच वेळी अटकेचे अधिकार राखून हा जामीन त्यांना देण्यात आला होता. त्यानंतर कुडाळ पोलिसांनी या पाचही संशयित आरोपींना आज पुन्हा अटक करून सायंकाळी उशिरा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या पाचही जणांना सात ऑगस्टपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

You cannot copy content of this page