एक राखी लाडक्या देवाभाऊसाठी अभियान…

जिल्हा भाजप एक लाख राख्या पाठविणार:लाडक्या बहिणींनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन,प्रभाकर सावंत..

⚡ओरोस ता ४-: महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणी लाडका भाऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या रक्षाबंधन औचित्यावर महाराष्ट्र प्रदेश भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून प्रत्येक बुथवरून १०० याप्रमाणे एकूण १ कोटी राख्या आणि त्यांच्यासाठी शुभसंदेश पाठविण्याचे एक विशेष अभियान नियोजित केलेले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक लाख राख्या व शुभसंदेश पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या पत्रकार कक्षात सोमवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत श्री सावंत बोलत होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, वृंदा गवंडळकर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना श्री सावंत यांनी,
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही या नाविन्यपूर्ण अश्या अभियानाचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण ९२१ बूथवरून प्रत्येकी किमान १०० राख्या अशा एकूण १ लाख राख्यांचे लिफाफे महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात पाठवण्यात येणार आहेत. त्यानंतर एका विशेष कार्यक्रमात या सर्व राख्या मुख्यमंत्री फडणवीस स्वाधीन करण्यात येणार आहेत. ९ ते १२ ऑगस्ट दरम्यान हे अभियान संपन्न होणार आहे, असे सांगितले.
जिल्हा भाजपाने जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा तसेच मंडल निहाय समित्यांचे गठण केलेले आहे. महिला जिल्हाध्यक्षा सौ श्वेता कोरगावकर आणि जिल्हा सरचिटणीस संदीप साटम हे या अभियानाचे जिल्हा संयोजक असणार आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक मंडलात दोन संयोजक नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्हा परिषद, पंचायत समिती, शक्तीकेंद्र आणि बूथस्तरावर या अभियानाचे नियोजन सोमवारी झालेल्या नियोजन बैठकीत करण्यात आले.
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आर्थिक स्वरूपात मासिक भेट सुरू केल्याने समस्त महिला वर्गात एक समाधान आणि आनंदाचे वातावरण आहे. महिला भगिनींना आत्मनिर्भर आणि सन्मानित करणाऱ्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला मुख्यमंत्री फडणवीस यांना एक राखी आणि त्यांच्यासाठी शुभसंदेश पाठवणार आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले.
यासाठी जिल्हा भाजपकडून एक विशेष लिफाफा घरोघरी देण्यात येणार असून त्यामध्ये भगिनींनी आपल्याकडील राखी, दोरा आणि एक कागदावर दोन ओळीचा शुभसंदेश लिहून त्यावर आपल्या नाव पत्ता नंबर सह भाजपा कार्यकर्त्यांकडे सुपूर्द करतील. त्यानंतर हे लिफाफे जिल्हा कार्यालयात जमा करण्यात येतील, असे सावंत यांनी सांगितले. यावेळी सावंत यांनी, भाजपा कार्यकर्ते भगिनींच्या घरापर्यंत पोचतीलच पण ज्या भगिनींशी संपर्क होऊ शकणार नाही,अश्या भगिनींनी आपल्या तालुक्यातील भाजपा कार्यालयात आपली राखी जमा करावी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना रक्षाबंधन भेट द्यावी.

चौकट
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रदेश स्तरावर महत्त्वाकांक्षी अशा संपर्क अभियानाला सुरुवात केलेली आहे. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिनी २२ जुलै रोजी राज्यात एकाच दिवशी १०८८ मंडलात ७८३१३ बॉटल इतके विक्रमी रक्त संकलन केले,या विक्रमाची जागतिक स्तरावर नोंद झाली होती. त्याप्रमाणे हे अभियानही विक्रमी असणार आहे, असे श्री सावंत यांनी सांगितले.

फोटो ओळ:- सिंधुदुर्गनगरी:

You cannot copy content of this page