⚡कुडाळ ता.०१-: सिद्धिविनायक बिडवलकर खून प्रकरणी संशयित आरोपित अनिकेत देवदास गावडे रा. पिंगुळी तालुका कुडाळ याला सिंधुदुर्ग ओरोस येथील मे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने रु. ५० हजार रकमेचा जामीन मंजूर केला आहे. संशयित आरोपीच्या वतीने ॲड. संजीव प्रभू आणि ॲड. अश्विनी बोभाटे, ॲड. दिव्या म्हाडदळकर आणि ॲड. सिद्धेश तवटे यांनी काम पाहिले. यासाठी ॲड. संदेश तायशेटे यांचे मार्गदर्शन लाभले.
याबाबत ऍड. संजीव प्रभू यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवती पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गाव मौजे चेंदवण नाईकनगर कोचरेकरवाडी, तालुका कुडाळ येथील घरी माहे मार्च 2023 गुढीपाडव्याच्या सणानंतर साधारण 10 ते 15 दिवसांच्या मुदतीत सदर गुन्हा घडलेला आहे. यातील अपहत सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर रा.चेंदवण नाईकनगर कोचरेकरवाडी,तालुका कुडाळ याने आरोपी सिद्धेश शिरसाट याचेकडून घेतलेले पैसे परत केले नाहीत, या कारणास्तव आरोपी क्र.1 सिद्धेश शिरसाट, आरोपी क्र .2 गणेश नार्वेकर, आरोपी क्र.3 सर्वेश केरकर, आरोपी क्र.4 अमोल ऊर्फ वल्लभ शिरसाट यांचे मदतीने, संगनमताने मयत सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर यांचे घरी चेंदवण नाईकनगर कोचरेकरवाडी, तालुका कुडाळ येथे जाऊन त्यास घरच्या बाहेर ठार मारण्याच्या उद्देशाने जबदस्तीने कारमधून नेऊन त्याचे अपहरण केल्याप्रकरणी आरोपी क्र.1 ते 4 यांनी भारतीय दंडविधान कायदा कलम 364 कलम 34 प्रमाणे गुन्हा केला. त्यानंतर आरोपी क्र.1 ते 4 यांनी संशयित आरोपी क्र.5 अनिकेत देवदास गावडे रा. पिंगुळी तालुका कुडाळ, आरोपी क्र.6 लक्ष्मण उर्फ गौरव आत्माराम वराडकर रा.सातार्डा या सर्वांनी मिळुन संगनमताने, एकमेकाच्या साथीने कुडाळ येथे कट रचून सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर कुडाळ पंचायत समितीच्या पाठीमागील घराचे समोर जीवे ठार मारले आणि त्यानंतर मयत यांचे प्रेत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने वाहनाने सातार्डा येथील स्मशानभूमीत घेऊन जाऊन मयत याचे प्रेत जाळले. त्यानंतर त्याचा कोणालाही सुगावा लागू नये याकरीता मयताची जाळलेली हाडे आणि राख गोणीत भरून तेरेखोल नदीच्या पात्रात टाकून पुरावा नष्ट केला.
आरोपी क्र.1 ते 6 यांनी भारतीय दंडविधान संहिता कायदा कलम 302, 201, 120ब, 34 प्रमाणे निवती पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. संशयित आरोपी क्र.5 अनिकेत देवदास गावडे याचे जामिनासाठी सिंधुदुर्ग ओरोस येथील मे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. संशयित आरोपी क्र. 5 याला दिनांक 17 /4/2025 रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता त्याला 19/4/2025 पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. त्यानंतर पुन्हा 19/4/2025 न्यायालयात हजर केले असता त्याला दिनांक 22/4/2025 पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. त्याला पुन्हा दिनांक 22/4/2025 रोजी न्यायालयीन कोठडीचा आदेश करण्यात आला. मे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीम. व्हि. एस. देशमुख यांनी आरोपी क्र.5 याला 50000/ रकमेचा सशर्त जामीन मंजूर केला.
संशयित आरोपी क्र.5 याचे वतीने ॲड. संजीव प्रभू आणि ॲड. अश्विनी बोभाटे , ॲड . दिव्या म्हाडदळकर, आणि ॲड.सिद्धेश तवटे यांनी काम पाहिले.ॲड. संदेश तायशेटे यांचे मार्गदर्शन लाभले.
सिद्धिविनायक बिडवलकर खून प्रकरणी संशयिताला सशर्त जामीन मंजूर…
