खासदार नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत वेधले लक्ष :स्वदेश दर्शन २.० योजनेत समावेश करण्याची केली मागणी..
⚡सिंधुदुर्ग दि.३१-: मुंबईसह कोकण भागातील काही समस्यांवर, विकासकामांबाबत खासदार नारायण राणे यांनी बुधवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान खासदार राणे यांनी मांडलेल्या विषयांना पंतप्रधान मोदी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून या विषयांमुळे कोकण, मुंबईच्या विकासामध्ये भर पडणार असल्याचे मोदी यांनी सांगितले.दरम्यान तिलारी धरण परिसराला पर्यटनाचे लागणार आंतरराष्ट्रीय कोंदण लाभणार आहे.खासदार नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत तिलारी धरण परिसराचा स्वदेश दर्शन २.० योजनेत समावेश करण्याची मागणी केली आहे.
जिल्ह्याच्या पर्यटन प्रतिमेला आणखी बळकटी देण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले आहे. माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी दुपारी १२.१५ वाजता भेट घेत कोकणच्या विविध प्रश्नांबरोबरच मुंबईच्या प्रश्नांवरही चर्चा केली. यावेळी दिलेल्या निवेदनात तिलारी धरण परिसरातील जैव विवधतेकडे पंतप्रधांनांचे लक्ष वेधले. या परिसराचा केंद्र सरकारच्या ‘स्वदेश दर्शन २.०’ योजनेत समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. भारताच्या पर्यावरणीय, सांस्कृतिक आणि पर्यटन पुनरुत्थानासाठी असलेल्या आपल्या अतूट वचनबद्धतेबद्दल पंतप्रधानांची मनापासून कृतज्ञता व्यक्त करतानाच पंतप्रधानांना दिलेल्या निवेदनात खा.नारायण राणे म्हणाले,मी आपले लक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी धरण परिसरातील एकात्मिक पर्यटन विकासाच्या प्रचंड क्षमतेकडे वेधू इच्छितो आणि स्वदेश दर्शन २.० योजनेत त्याचा समावेश करण्याची विनंती केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून मान्यता मिळाली आहे. हा जिल्हा सुंदर किनारा, घनदाट जंगलं, धबधबे आणि ऐतिहासिक किल्ले व मंदिरांसारख्या समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी ओळखला जातो. नापणे धबधब्यावर महाराष्ट्रातील पहिल्या काचेच्या पुलाचे नुकतेच झालेले उद्घाटन हे आपल्या देशांतर्गत पर्यटन विकासाच्या दूरदृष्टीचे प्रतीक आहे आणि यामुळे जिल्ह्याच्या पर्यटन प्रतिमेत आणखी भर पडली आहे.तिलारी धरण परिसर हा २०० एकरपेक्षा जास्त शासकीय जमिनीवर पसरलेला असून, एक सर्वसमावेशक आणि पर्यावरपूरक पर्यटन केंद्र निर्माण करण्यासाठी तो आदर्श आहे. स्वदेश दर्शन २.० योजनेच्या उद्दिष्टांशी सुसंगत, खालील पायाभूत सुविधा प्रस्तावित आहेत:
१) स्वच्छता सुविधा आणि सुशोभित हिरवीगार जागा
२) स्थानिक कोकणी आणि मालवणी पदार्थांना प्रोत्साहन देणारी रेस्टॉरंट्स
३) पर्यावरणपूरक निवास व्यवस्था: रिसॉर्ट्स, होमस्टे, बांबूची कॉटेजेस
४) समर्पित पार्किंग आणि पर्यटक माहिती केंद्रे
५) निसर्ग पायवाटा, सायकलिंग मार्ग, बोटिंग, ट्रेकिंग आणि साहसी पर्यटन
स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना, पर्यावरणाचेही रक्षण
या प्रकल्पामुळे कोकण प्रदेशातील पर्यटन परिसंस्थेत लक्षणीय वाढ होईल. यातून स्थानिक रोजगार निर्मितीला चालना मिळेल, उद्योजकता वाढेल आणि स्थानिकांमध्ये कौशल्य विकास होईल. त्याचबरोबर, या प्रदेशाची पर्यावरणीय आणि सांस्कृतिक अखंडता जपली जाईल, याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे.या सर्व बाबी विचारात घेऊन, तिलारी धरण परिसराचा स्वदेश दर्शन २.० योजनेत समावेश करून, एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून त्याचा एकात्मिक आणि शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी आपले सहकार्य मिळावे, अशी विनंती खा. राणे यांनी केली आहे.
खासदार नारायण राणे यांनी बुधवारी दुपारी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. या बैठकीत मुंबई येथील प्रसिद्ध मुंबा देवी मंदिर व परिसराचा विकास केंद्र सरकारच्या ‘प्रसाद’ योजनेच्या माध्यमातून कसा करता येईल, या ठिकाणी आधुनिक सुविधा, भक्तांसाठी मूलभूत सोयी तसेच काशी विश्वेश्वराच्या धर्तीवर मुंबा देवी मंदिर जागतिक पटलावर कसे आणता येईल. या विषयाचे निवेदन दिले. सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी त्यांना आश्वस्त केले.