सिंधुदुर्ग जिल्हा भजनी कलाकार संस्थेचे अध्यक्ष संतोष कानडे यांची माहिती..
⚡कणकवली ता.३०-: जिल्ह्यातील भजनी मंडळांना सिंधुदुर्ग जिल्हा परिषद च्या माध्यमातून मागील वर्षी भजन साहित्य देण्यात आले होते. यावर्षी मात्र या योजनेत बहुतांश बदल करण्यात आले आहेत. यावर्षी पासून भजनी मंडळांना भजन साहित्य किंवा साहित्य दुरुस्त करण्यासाठी करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. यामुळे भजनी मंडळांना साहित्यात मदतीचा हात पुढे होणार आहे. सदरची योजना ही नवीन योजना असल्याने भजनी मंडळांना नव्याने या योजनेचा लाभ घेण्यासाठी नव्याने ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. प्राप्त झालेल्या अर्जांची लकी ड्रॉ पद्धतीने सोडत काढून गणेशोत्सवापूर्वी पंधरा दिवस आधी दीडशे भजन मंडळांना साहित्य खरेदी किंवा दुरुस्तीसाठी अनुदान भजन मंडळांच्या बॅक खात्यावर जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा भजनी कलाकार संस्थेचे अध्यक्ष संतोष कानडे यांनी दिली.
कणकवली येथे खासदार नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भजनी कलाकार संस्थेचे सचिव गोपी लाड, खजिनदार मयुर ठाकूर उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले, भजनी मंडळांना साहित्य खरेदी तसेच दुरुस्तीसाठी अनुदान मिळावे, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार संस्थेतर्फे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्याकडे मागणी केली होती. मंडळाच्या मागणीनुसार पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी या योजनेत बदल करण्याचे निर्देश जि. प. प्रशासनाला दिले होते. संबंधित अधिकाऱ्यांना योजनेतील बदलाचा प्रस्ताव तयार करून जि. प. चे मुख्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केला होता. त्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे भजनी मंडळांना साहित्य दुरुस्ती किंवा खरेदीसाठी जि. प. कडून अनुदान मिळणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून भजनी कलाकारांना जि. प. कडून साहित्य पुरविण्याची योजना सुरू झाली होती. मात्र जि.प.कडून देण्यात येणारे साहित्य दर्जेदार नव्हते. त्यामुळे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्याकडे भजनी साहित्य पुरविण्या ऐवजी अनुदान द्यावे, अशी भजनी कलाकार मंडळाने केली. त्यानुसार या योजनेत बदल करण्यात आले आहे.
जि.प.भजनी मंडळांना साहित्य पुरविण्याऐवजी साहित्य खरेदी किंवा दुरुस्ती अनुदान देणार आहे. गणेशोत्सवापूर्वी जिल्ह्यातील दीडशे मंडळांना १२ ते १५ हजार रुपयांचे अनुदान मंडळाच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहे. भजनी कलाकारांना साहित्य पुरवणे योजनेत आता बदल करण्यात आल्या मंडळांना नवीन साहित्य खरेदी किंवा जुन्या साहित्याच्या दुरुस्तीसाठी अनुदान हवे, असल्यास मंडळांना ऑनलाइन अर्ज करावा लागला. हा अर्ज ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करून दिला जाणार आहे. गावातील भजनी मंडळांनी अर्ज ऑनलाइन स्वरुपात भरावा. गावनिहाय आलेले अर्ज पंचायती समिती स्तरावर एकत्रित करून ते जिल्हास्तरावर पाठवले जाणार आहेत.
अनुदानासाठी प्राप्त झालेल्या अर्जांची लकी ड्रॉ पद्धतीने सोडत काढली जाणार आहे. त्यापैकी यंदा दीडशे मंडळांना साहित्य व दुरुस्तीसाठी १२ ते १५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. जिल्ह्यामध्ये दोन हजार पेक्षा जास्त मंडळे आहेत. अनुदान मिळण्यासाठी मंडळांनी जिल्हा बँकेमध्ये खाते काढले पाहिजे. पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत भजनी मंडळांना अनुदान वितरणाचा कार्यक्रम घेतला जाणार आहे असेही श्री. कानडे यांनी सांगितले.