रुपेश राऊळ यांचा आरोप:भाजप-शिंदे सरकारचे कोकणावरील प्रेम बेगडी असल्याचे यातून उघड झालय..
⚡सावंतवाडी ता.२९-: यंदाच्या हंगामात पूर्व-पावसाने, अवकाळी पावसाने आणि अनियमित पर्जन्यमानाने पिकांचे मोठे नुकसान झाले असतानाही, राज्य सरकारने नुकसान भरपाई देताना कोकणातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे, अशी जोरदार टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी केली आहे.
भाजप-शिंदे सरकारचे कोकणावरील प्रेम बेगडी असल्याचे यातून उघड झाल्याचे राऊळ म्हणाले.
राऊळ यांनी कोकणातील शेतकऱ्यांची भाजप-शिंदे सरकारकडून क्रूर चेष्टा थांबवण्याची मागणी केली आहे. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३३७ कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली असताना, कोकणाच्या वाट्याला केवळ ९ कोटी ३८ लाख २४ हजार रुपये आले आहेत. यावरून कोकणातील शेतकरी आणि बागायतदारांविषयी या सरकारचे किती बेगडी प्रेम आहे, हे स्पष्ट होते. महाराष्ट्रातील इतर विभागांना कोट्यवधी रुपयांची मदत दिली जात असताना, कोकणाला मात्र कवडीमोल मदत मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
कोकणातील सत्ताधारी नेत्यांवर प्रश्नचिन्ह:
कोकण विभागावर होत असलेला हा अन्याय सिद्ध होत असताना, मोठ्या बाता मारणारे कोकणातील सत्ताधारी मंत्री आणि आमदारांची सत्तेतील किंमत जनतेला दिसत असल्याचे राऊळ यांनी म्हटले आहे. भाजप-शिंदे सरकार स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी समजत असले तरी, कोकणातील शेतकरी मात्र उपाशीच दिसत आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांच्या विविध समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष:
फळपीक विम्याची रक्कम वेळेवर न मिळणे, अवकाळी पावसामुळे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना योग्य ती मदत न मिळणे, पिकाला हमीभाव न मिळणे, तसेच वन्य प्राण्यांमुळे होणारे मोठ्या प्रमाणातील नुकसान अशा अनेक समस्यांनी येथील शेतकरी आणि बागायतदार त्रस्त आहेत. परंतु, या गोष्टी सरकारला दिसत नाहीत, हे दुर्दैव असल्याचे रूपेश राऊळ यांनी सांगितले.
पंचनाम्यांवरूनही शेतकऱ्यांची नाराजी:
कोकणातील शेतकरी आणि बागायतदारांच्या नुकसानीचे पंचनामे करूनही सरकारने त्यांची थट्टा केली असल्याचा आरोप राऊळ यांनी केला आहे. यामुळे शेतकरी आणि बागायतदार चिंतेत असल्याचे त्यांनी सांगितले.